मासोळी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडाल्याने झाला मृत्यु
परभणी/गंगाखेड (Farmer Death) : पोळ्याच्या दिवशी शेतातील बैल आणण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा मासोळी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यु (Farmer Death) झाल्याची घटना दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील ईसाद येथील उध्दव धोंडीबा भोसले वय ५० वर्ष हे दि. २ सप्टेंबर सोमवार रोजी पोळा सण असल्याने मासोळी नदी ओलांडून शेतात असलेले बैल आणण्यासाठी गेले होते. बैल घरी आले मात्र उध्दव धोंडीबा भोसले हे घरी आले नसल्यामुळे व त्याच दरम्यान मासोळी नदीला पूर आल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नसल्याने दि. ३ सप्टेंबर मंगळवार रोजी त्यांचा मुलगा प्रभाकर भोसले याने गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने हरवल्याची नोंद घेण्यात आली.
दि. ४ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी उद्धव धोंडीबा भोसले यांचा मृतदेह ईसाद शिवारातील मासोळी नदी पात्रात काटेरी झाडाच्या झुडपाला अडकलेल्या अवस्थेत दत्ता नरहरी सातपुते रा. ईसाद यांना दिसून आल्याने पंचनामा व शवविच्छेदन करून मृतदेह (Farmer Death) नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी मयत उध्दव भोसले यांचा मुलगा प्रभाकर उध्दव भोसले याने दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गणेश चनखोरे, पो. शि. धनंजय कणके हे करीत आहेत.