सोयाबीनसाठी एल्गार! पुढाऱ्यांना गावबंदी करा!
रविकांत तुपकर व घाडगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
लातूर (Farmer Elgar) : शेतकऱ्यांनो आपण आजवर आपल्या शेतमालाला किमान हमीभाव मिळावा यासाठी अनेकवेळा आंदोलन केली. परंतु संवेदनाहीन सरकारला शेतकऱ्यांचे कांहीही देणं घेणं नाही. शेतकऱ्यांना अशीच वागणूक दिली जात असून, आता आपली वोट बँक तयार ठेवा आणि आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुढाऱ्यांना गावात पाय ठेऊ देऊ नका, असे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर व छावाचे विजयकुमार घाडगे पाटील यांनी केले. लातुरात आयोजित (Farmer Elgar) शेतकरी एल्गार कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमाशी बोलत होते.
शेतकऱ्यांना त्याचा मूलभूत हक्क मिळावा, त्याच्या किमान मागण्या मान्य व्हाव्या यासाठी विदर्भात मी प्रयत्न करतोय आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय छावाचे शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील लढा देत आहेत. सोयाबीनला 8500 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, या मागणीसाठी सलग चौदा दिवस आमरण उपोषण केल्यानंतर आश्वासन देऊनही सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे येणाऱ्या आम्ही राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचून आमची लढाई तीव्र करणार आहोत, असे यावेळी (Farmer Elgar) शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील म्हणाले.
सरकार लाडक्या बहिणीला दीड हजार देऊन खुश करत आहे. मात्र दाजीच्या सोयाबीनला कवडीमोल दर देत असल्यामुळे दाजी फाशी घेतोय, हे लक्षात येत नाही का? असा सवाल उपस्थित करून सरकारने डीओसी निर्यातीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी तुपकर यांनी केली. या पत्रकार परिषदेसाठी छावाचे भगवान माकणे, लक्ष्मीकांत जोगदंड, शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, देवकर्ण वाघ, राजेंद्र मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मराठवाडाभर जनजागृती
यावेळी माध्यमाशी बोलताना विजयकुमार घाडगे पाटील म्हणाले, औसा येथे आपण 14 दिवस उपोषण केले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री यांनी दरवाढीचे आश्वासन दिले. मात्र अद्याप याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता मैदानी लढाईसाठी आम्ही सज्ज झालो असून मराठवाडाभर फिरुन सोयाबीनला वाढीव हमीभाव मागणीबाबत आपण (Farmer Elgar) शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार असल्याचे घाडगे पाटील म्हणाले.




