रिसोड (Risod) :- रिसोड तालुक्यातील मोठेगावातील एका शेतकऱ्याच्या शेतात ठेवलेल्या जनावराच्या चाऱ्याच्या सुडींना आग (Fire) लागून या आगीमध्ये तब्बल पाच लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दिनांक 14 मार्च रोजी दुपारी तीन वाजता घडली.
आग कशामुळे लागली याबाबत मात्र कळू शकले नाही
सदर घटनेची माहिती रिसोड नगर परिषद च्या अग्निशमन दल विभागाला देण्यात आली. मात्र अग्निशमन दल विभागाने (Fire Department) जरी आग आटोक्यात आणली मात्र जनावरांचा चारा वाचण्यात त्यांना अपयश आले. याबाबत माहिती अशी की मोठेगाव शेत शिवारामध्ये तलावाच्या जवळ मंचकराव बाळासाहेब देशमुख यांचे शेत असून या शेतात त्यांनी जनावरांच्या साठी गवताच्या पेंढ्याच्या दोन सुड्या लावल्या होत्या. यामध्ये एका सुडीमध्ये 25000 गवताच्या पेंड्या होत्या. अशा एकूण दोन सुड्यांमध्ये पन्नास हजार पेंड्या लावून त्यांनी वर्षभरासाठी जनावरांचा चारा एकत्रित करून ठेवला होता.मात्र दिनांक 14 मार्च रोजी सदर सुडींना अचानक आग लागली. आग कशामुळे लागली याबाबत मात्र कळू शकले नाही. मात्र या आगीमध्ये दोन्ही सूड्या जळून खाक झाल्या. यामध्ये पाच लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे मंचकराव देशमुख यांनी सांगितले. सदर आगी मध्ये चारा जळून खाक झाला असल्याने आता शेतकऱ्यांवर जनावरांच्या चारा चा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदर आगीचा पंचनामा करून शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.