तिढा सुटता सुटेना; प्रती क्विंटल १० रुपये कसे परवडणार
सडक अर्जुनी (farmer news ) : विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या पाच जिल्ह्यातच (Paddy yield) धानाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. राज्यात गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. मात्र राज्य शासनाच्या मनमर्जी कारभारामुळे धान भरडाई रखडली आहे. राईस मिलर्सना (Rice Millers) शासनाकडून प्रति क्विंटल १० रूपये तुटपुंजी धान भरडाई दिली जाते. याचा विरोध म्हणून राईस मिल मालकांनी मिलींग बंद करून हरताळ पुकारला आहे. केंद्र व राज्य शासन अंतर्गत आधारभूत धान खरेदी व धान भरडाई शासनामार्फत सन २०१६-१७ पासून सुरू आहे. केंद्र शासनाची आधारभूत धान खरेदी योजना राज्य शासनाला राबवायची असते.
राईस मिल मालकांचे मोहभंग
तसेच धान भरडाई करणार्या (Rice Millers) मिलर्संना राज्य शासनाकडून सन२०१६-१७ पासून खरीप हंगाम सन २०२१ पर्यंत वेळोवेळी आर्थिक मदत दिली जात होती. मात्र रब्बी हंगाम सन २०२०-२१ पासून मिल मालकांना आश्वासन देऊन सतत अडीच ते तीन वर्षापासून १० रूपये प्रती क्विंटल धान भरडाई देण्यात येते. मागिल सन २०२०-२१,२०२१-२२ तसेच २०२२-२३ व चालू हंगाम सन२०२३-२४ साठी महाराष्ट्र शासनाने प्रती क्विंटल १० रुपये प्रमाणे धान भरडाई दर ठरविले आहे. त्यामुळे धान भरडाई करणार्या मिलर्संना धान हमाली, मिलींग व तांदूळ हमाली वरील काम करणार्या मिलर्स मालकांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन शासनकर्ते व जनप्रतिनिधी देत आहेत. परंतु, आश्वासनाची पुर्तता झालेली नाही. परिणामी राईस मिल मालकांचे मोहभंग झाले असून भरडाईत सतत होत असलेले नुकसान पाहून यावर्षी धान मिलींग करणार्या संस्थांनी विरोध करीत भरडाई न करता मिलर्संना ताळे ठोकून हरताळ करीत आहेत.
भरडाईअभावी जवळपास ३५ लाख क्विंटल धान पडून
गोंदिया जिल्ह्यालगत मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्य आहे. तेथील राज्य शासन धान मिलींग (Rice Millers) करणार्या मिलर्संना १२० ते २४० रुपये प्रोत्साहन मदत करीत असते. परंतू महाराष्ट्र राज्यात अद्यापही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मागील ५ वर्षांपासून ही समस्या कायम आहे. यामुळे आजघडीला गोंदिया जिल्ह्यात ३५ लाख क्विंटल धान गोदाम व बाहेर उघड्यावर पडून आहे.
धान नष्ट होण्याची भिती
जिल्ह्यात अवकाळीचे ढग कायम आहेत. सतत अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे गोदामाबाहेर उघड्यावर पडून असलेला धान पाण्यात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी धान पाण्यात आल्याने सडून नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जवळपास ३ हजार कोटीचा चुराडा होणार? असेही शेतकर्यांकडून बोलले जात आहे.
रब्बी हंगामातील धानखरेदी प्रभावित
आधीच भरडाईसाठी धान उचल होत नसल्याने खरेदी केंद्राचे गोदाम हाऊसफुल आहेत. त्यात खरीपातील खरेदी केलला धान उघड्यावर पडून आहे. अशा परिस्थितीत शेतकरी रब्बी हंगामातील धानखरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत आहेत. सद्यस्थिती पाहता रब्बी हंगामातील धान खरेदी शासन करणार की नाही? याचीही शाश्वती राहिलेली नाही. (Rabi season) रब्बी हंगामातील धान कापणी व मळणी सुरू झाली असून अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे रब्बीतील धानखरेदी प्रभावित होणार, असे स्पष्ट दिसून येत आहे. या सर्व प्रकारात शेतकर्यांना कवडीमोल भावात धान विकणे भाग पडत आहे.