जिंतूर(Jintur):- बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी(seriously injured) झाल्याची घटना तालुक्यातील केहाळ तांडा शिवारात दि 7 जून शुक्रवारी रोजी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडली. जिंतूर तालुक्यातील डोंगराळ भागात मागील अनेक महिन्यांपासून बिबट्याचा(Leopard) वास आहे. यापूर्वीही या भागात बिबट्याने अनेक शेतकरी(farmer) नागरिक तसेच पशुधनावर हल्ले केले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा वनविभागाला माहिती देखील दिली आहे. मात्र वन विभागाचे(Forest Department) अद्याप पर्यंत दुर्लक्ष होत आहे.
वनविभागाने तात्काळ शोध घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा
त्यातच दि.7 जून शुक्रवारी रोजी सकाळी तालुक्यातील केहाळ तांडा शिवारात बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. येथील शेतकरी शेषराव सखाराम जाधव वय 45 हे सकाळी साडेपाच वाजता गाईचे दूध काढण्यासाठी शेत आखाडयावर गेले होते. यावेळी बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे रेफर केले आहे. वनविभागाने तात्काळ शोध घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा व सदर शेतकऱ्यास योग्य ती मदत द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.