हिंगोली (farmer suicide) : तालुक्यातील पिंपळखुटा येथील तरूण शेतकर्याने कर्ज व नापिकीला कंटाळून रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या (farmer suicide) केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथील राजू साहेबराव गताडे (३४) या शेतकर्याला गावालगत दोन एकर शेती असून त्याने सोयाबीनसह इतर पीक घेतले होते. पेरणीच्या वेळी त्याने बँकेकडून कर्ज घेतले होते. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उदर निर्वाह कसा चालवावा आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेतून ते काही दिवसापासून अस्वस्थ होते.
६ ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले होते. रात्र होऊनही घरी परतले नसल्याने कुटुंबियांनी गावामध्ये व शेत शिवारात शोध घेतला; परंतु त्यांचा थांगपत्ता लागेनासा झाल्याने कुटुंबियांनी हिंगोली ग्रामीण पोलिसात याबाबतची माहिती दिली. याच दरम्यान पोलिसांना हिंगोली ते कनेरगाव रेल्वे मार्गावर सावा शिवारात एका व्यक्तीचा रेल्वे रूळावर मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह जमादार जमधाडे, आशिष उंबरकर यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. (farmer suicide) मृतदेह पाहणी नंतर राजू गताडे याचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. रात्री हा (farmer suicide) मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आला. ७ ऑक्टोंबर रोजी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. घटनेबाबत हिंगोली ग्रामीण पोलिसात अद्यापपर्यंत नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.