औंढा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथील घटना
हिंगोली (Farmer Suicide) : मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळत नसल्याने तसेच लेकरांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने हताश झालेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथील ३४ वर्षीय शेतकर्याने झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथील संतोष मुकींदा कदम याने मराठा आरक्षणा करीता अनेक वेळा आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. शासनाकडून समाजाला आरक्षण (Maratha reservation) दिले जात नसल्याने त्यातच घरची परिस्थिती बिकट असल्याने लेकरांना शिकविण्यासाठी पैसे नसल्यामुळे २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४५ वाजता तपोवन शिवारातील ईनामी जमिनीवरील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Suicide) केली. रस्त्यावरून जाणार्या काही शेतकर्यांना हा मृतदेह दिसून आल्याने याबाबतची माहिती गावामध्ये देताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.
याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेबाबत त्र्यंबक कदम यांनी हट्टा पोलिसात दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक केंद्रे हे करीत आहेत. मयत संतोष कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, वडील, भाऊ, भावजय असा मोठा परीवार आहे.