हिंगोली जिल्ह्यातून अर्ध नग्न आंदोलनासाठी मुंबईला गेलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे आश्वासन
हिंगोली (Farmers Andolan) : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न दिड महिन्यात मार्गी लावला जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयातून आलेले मुख्यमंत्र्यांचे ओएसडी प्रमोद पाटणकर यांनी हिंगोलीच्या आंदोलक शेतकऱ्यांना बुधवारी १२ फेब्रुवारीला सायंकाळी देण्यात आले आहे. तर हमी योजनेच्या कामांच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाशी चर्चा करण्याचे या शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे (Farmers Andolan) कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा द्यावा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नामदेव पतंगे, गजानन कावरखे, दीपक सावके, प्रविण मते, राजेश मते, गजानन जाधव, शांतीराम सावके, यांच्यासह शेतकरी मंत्रालयासमोर अर्धनग्न आंदोलनासाठी गेले होते.
त्यानंतर या शेतकऱ्यांनी वाशी येथील चेकपोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी शेतकरी व पोलिसांमध्ये शाब्दीक चकमकही झाली. मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आझाद मैदान गाठले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्र्यांचे ओएसडी प्रमोद पाटणकर यांच्या सोबत शेतकऱ्यांची चर्चा झाली.
राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers Andolan) कर्ज माफीचा प्रश्न पुढील एक ते दिड महिन्यात मार्गी लावला जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. या शिवाय हमी योजना, पिकविमा संदर्भात जिल्हा प्रशासनाशी चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच अतिवृष्टीचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले आहे. त्यामुळे तुर्तास हे आंदोलन थांबविण्यात आले आहे. दिलेल्या आश्वासनामुळे दोन महिने आंदोलन थांबविण्यात आले असून एप्रिल अखेरपर्यंत शासनाने या मागण्यांवर निर्णय न घेतल्यास मे महिन्याच्या सुरुवातीला अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलन शेतकऱ्यांनी दिला आहे.