परभणी/पाथरी (Parbhani):- अतिवृष्टी ग्रस्त भागातील पीक नुकसानीची पाहणी केली असून परिस्थिती विदारक असल्याचे मान्य करत बाधित शेतकऱ्यांना तीन प्रकारे मदत देणार असून एनडीआरएफ (NDRF)व एसडीआरएफ च्या निकषांमध्ये व त्यापेक्षा जास्त मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री (Agriculture Minister) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा देत आश्वासित केले आहे.
अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
कृषिमंत्री धनंजय मुंडे हे बुधवार 4 सप्टेंबर रोजी पाथरी तालुक्यातील रेणापूर व बोरगव्हाण येथे अतिवृष्टी (heavy rain) नंतरच्या पिकांची पाहणी करण्यासाठी धावत्या दौऱ्यावर आले होते .दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाथरी तालुक्यातील रेणापूर शिवारामध्ये त्यांनी अतिवृष्टी नंतर पूर आलेल्या भागातील पिकांची पाहणी केली .यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेश विटेकर यांची उपस्थिती होती. स्थानिक शेतकऱ्यांनी नुकसानी संदर्भात माहिती देत निवेदन सादर केली. पिकासह जमीन खरडून गेल्या असून स्पिंकलर पाईप, ठिबक, जनावरे मृत्युमुखी पडल्या संदर्भात शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले कि, तीन प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल त्यात जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना वेगळं निकषाने जनावरे यासाठी वेगळी मदत व पीक नुकसानीसाठी एसडीआरएफ, एनडीआरएफच्या निकषानुसार व त्यापेक्षा अधिक मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
खरडून गेलेल्या जमिनीचे होणार पंचनामे
खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे होणार असून उर्वरित शेतकऱ्यांना सरसकट मदत उद्या मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर घोषित होईल असं ते म्हणाले. यावेळी विमा कंपनीकडून 25 टक्के अग्रीम शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 2021- 22 च्या विम्या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी विचारणा केली असता या संदर्भात शुक्रवारी बैठकीचे आयोजन केल्याचे ते म्हणाले. यानंतर बोरगव्हाण येथे त्यांनी नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. यावेळी जि.प .चे माजी सदस्य दादासाहेब टेंगसे, श्रीकांत विटेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख नाना टाकळकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष भावनाताई नखाते, कृऊबास संचालक संदीप टेंगसे, पप्पू घांडगे, शिवसेनेचे अमोल भाले पाटील, गोपाळ साखरे, रेणापूरचे उपसरपंच विक्रम गायकवाड, सरपंच विष्णूपंत उगले, कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, तहसीलदार शंकर हांदेश्वर आदी उपस्थित होते .