कळमनुरी/हिंगोली (Bachu Kadu) : भाजपा धर्माच्या नावाचा, काँग्रेस जातीचा झेंडा समोर आणत आहे. मात्र आम्ही शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांचा झेंडा घेणार आहोत. जे पक्ष आमच्या मुद्यांशी सहमत असतील त्यांना आम्ही सोबत घेऊत. आगामी निवडणुका लढविण्यासाठी पक्षाकडे आतापर्यंत २५ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र प्रत्येक ठिकाणी उमेदवाराची कार्यक्षमता, त्यांचा सामान्य माणसांप्रती आदरभाव लक्षात घेऊनच उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती प्रहार पक्षाचे आ. बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी दिली. तुम्ही जाती-धर्माच्या नावावर लढता आम्ही शेतकऱ्यांच्या नावावर लढतो असे ते म्हणाले.
दि.५ ऑगस्ट सोमवार रोजी तोष्णीवाल मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यात दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू (Bachu Kadu) बोलत होते. बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ घेणाऱ्या औलादींचा कोथळाच बाहेर काढला पाहिजे असे परखड मत त्यांनी पूजा खेडकर प्रकरणावर मांडले. या प्रकरणानंतर राज्यातून १५० दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची यादी आपल्याकडे प्राप्त झाली आहे. सदर यादी आपण शासनाकडे पाठविली आहे. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. शासकीय सेवेत असणाऱ्यांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोळ घातला असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी बलू जवंजाळ, प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे, प्रवीण हेडवे, रवी उर्फ रॉबर्ट बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी टीका केली. प्रहार पक्षाकडून लाडका मुख्यमंत्री, लाडका खासदार, लाडका आमदार ही योजना जाहीर करणार असून त्यांना प्रहारकडून १५०० रुपये महिना दिला जाईल, असे सांगत त्यांनी सरकारच्या योजनेची खिल्ली उडविली. शेतकऱ्यांसोबत आम्ही आहोत एकदा जर शेतकरी जागा झाला तर तुम्हाला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशाराही दिला, असे आ. बच्चू कडू म्हणाले. दि.९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास ३ ते ४ लाख लोक येतील. यामध्ये आम्ही १५ ते २० मुद्दे मांडणार असून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाला वेळ देणार आहोत. शासनाने आमचे मुद्दे मान्य करून अध्यादेश काढले तर आम्ही लढणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शेतकरी नेते डॉ. संजय लोंढे यांनी शेकडो कार्यकत्यांसह प्रवेश केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष बाळू खिलारे, बंटी पाटील यांनी पुढाकार घेतला.
प्रहार चे १५ ते २० आमदार आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू
प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) हे सध्या महायुतीत सामील असून सध्या ते नेहमीच शेतकऱ्यांच्या व इतर प्रश्नावर राज्य शासनाला घेरत आहे यामध्ये कळमनुरीत झालेल्या कार्यक्रमात महायुतीचे स्थानिक आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका करून प्रहारजनशक्ती पार्टीचे सध्या २ आमदार असून सध्या राज्य शासन व प्रशासनाला नाकी नऊ आणून सोडत आहेत जर प्रहार जनशक्ती पार्टीचे १५ ते २०आमदार आले तर मुख्यमंत्र्याच्या गणपती करू असे सांगून महायुती बद्दल त्यांनी आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखविली.
आमदार बच्चू कडू यांच्या कडून आयोजकांचे कौतुक
प्रहार जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्रभरात वर्चस्व वाढविण्यासाठी आमदार बच्चू कडू सर्वत्र दौरे व मिळावे घेत आहेत कळमनुरी येथे दि.५ ऑगस्ट रोजी डॉ.संजय लोंढे यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय उपस्थित होता या मेळाव्याचे योग्यरित्या आयोजकांनी आयोजन केल्याने आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी आयोजकांचे कौतुक करून ही लढाई २५टक्के आपण जिंकलो असे सांगितले.