हिंगोली (Hingoli):- शेतातील नापिकी व बँकेच्या कर्जामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील लोहरा खु.येथील ४८ वर्षीय शेतकर्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोहरा खु.येथील शेतकरी गणेश रामा राठोड (४८) यांना दोन एकर शेती असून त्या शेतीवरच त्यांच्या कुटुंबियाची उपजिवीका चालते. कुटुंबात जवळपास १२ सदस्य असून शेती व काहीजण रोजमजूरी करून उदर निर्वाह चालवितात.
औंढा नागनाथ तालुक्यातील लोहारा खुर्द येथील घटना
कधी कधी ऊस तोडीच्या कामावरही त्यांचा कुटुंबातील सदस्य जातात. औंढा नागनाथ येथील भारतीय स्टेट बँकेमधून(State Bank of India) त्यांनी मध्यंतरी ६० हजार रूपयाचे पीककर्ज घेतले होते. मध्यंतरी नापिकी झाल्याने हे कर्ज कसे फेडावे अशी चिंता त्यांना भेडसावत होती. यंदा त्यांनी शेतामध्ये कापसाची लागवड केली होती. अतिवृष्टी (heavy rain)व कधी पावसाच्या उघडीपमुळे कापसाचेही नुकसान झाले. त्यामुळे घेतलेले पीककर्ज कसे फेडावे या चिंतेतून त्यांनी शेतामध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी.एस. राहिरे, पोलिस उपनिरीक्षक किशोर पोटे, जमादार घुगे, राजेश ठाकूर यांच्या पथकाने जाऊन पाहणी केली. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिसात संतोष राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ५ सप्टेंबरला आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. पुढील तपास जमादार घुगे हे करीत आहेत.