जागृती देणार ऊसाला ३००० हून अधिकचा दर
वलांडी (Dilip Deshmukh) : समाजातील विविध घटकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन करणे हाच राजकारणाचा मुख्य पैलू आहे. निवडणुका होतात. सरकार येतात..जातात .. पण सरकार आल्यानंतर समाजासाठी काय ? असा प्रश्न उपस्थित करत तात्पुरती मदत करुन उदरनिर्वाह भागवणे नव्हे, तर शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हेच आमचे राजकारण असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री दिलीपराव देशमुख (Dilip Deshmukh) यांनी केले.
तळेगाव(भो) येथील जागृती शुगरच्या काॅम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प (सीबीजी) शुभारंभ कार्यक्रम गुरुवारी पार पडला. यावेळी देशमुख बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख, माजी आमदार त्र्यंबक भिसे, यशवंतराव पाटील, श्रीशैल्य उटगे, आबासाहेब पाटील, सर्जेराव मोरे, विजय देशमुख, प्रमोद जाधव, अनंतराव देशमुख, विजयकुमार पाटील, अशोकराव गोविंदपुरकर, संभाजी रेड्डी, संभाजी सुळ, प्रिती भोसले, शिलाताई पाटील, स्वयंप्रभा पाटील, किरीट प्रजापती, अशोक अग्रवाल, कौस्तुभ धोंडे, विजयकुमार तिवारी आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख (Dilip Deshmukh) म्हणाले की, यावर्षी जागृती कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला कमीत कमी प्रति मे.टन ३ हजार किंवा त्याहुन अधिकचा दर देईल. यावेळी आसवांनी प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन व सि बी जी गॅस ची पहिली गाडी मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन रवाना करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. भगवान गायकवाड यांनी तर आभार कार्यकारी संचालक गणेश येवले यांनी मानले. कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्वासाचे नाते दृढ : लक्ष्मण मोरे
१४ वर्षापुर्वी शेतकरी हिताचे कार्य करण्याचा वसा जागृती कारखान्याने घेतला . शेतकऱ्यांसोबत कारखान्याने विश्वासाचे नाते दृढ केल्याचा विश्वास कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
पुढचं दशक ऊर्जादात्याचे : धीरज देशमुख
ऊर्जा क्षेत्रात सौरऊर्जा प्रकल्पही होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करावे. यासाठी जिल्हा बँक तात्काळ कर्ज पुरवठा करेल. मांजरा परिवाराचे वेध, नववर्ष, नवा प्रकल्प यामुळे महाराष्ट्राच्या नजरा मांजरा परिवाराकडे लागल्या आहेत. बायोगॅस बरोबर ऊर्जा क्षेत्रात होत असलेली भरारी पाहता येणारे दशक हे उर्जादात्याचे असेल, असा ठाम विश्वास जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांनी व्यक्त केला.