मानोरा(Washim):- मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील शेतकऱ्यांनी मनरेगा योजने अंतर्गत सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण केले आहे. परंतू सिंचन विहीर बांधकामाचे अनुदान मिळत नसल्याने लाभार्थी शेतकरी (Farmer)आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. शासनाने याबाबीची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
शासनाचे दुर्लक्ष, स्वखर्चातून केले विहिरीचे बांधकाम
शासनाचे अनुदान मिळावे, यासाठी शेतकरी पंचायत समिती कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी स्व खर्चातून विहिरीचे बांधकाम केले आहे. शेतात सिंचनाची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर मंजूर झालेल्या आहेत. मात्र सुरुवातीला शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाहीत. तेंव्हा शेतकऱ्यांनी उसने कर्ज(Loan) काढून विहिरीचे बांधकाम पूर्ण केले आहे. परंतू सहा महिन्याचा कालावधी उलटूनही शासनाचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे रोहयो विभागाने आर्थिक संकटात सापडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहीर बांधकामाची रक्कम अदा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.