अगोदर शेत मालाला भाव द्या, त्यानंतरच अनुदानाच्या योजना राबवा
मानोरा (Soybeans Crop prices) : गेल्या काही दिवसापासून बाजारात सोयाबीन तेलाचे भाव ३० ते ३५ रूपयांनी महागल्याने सर्व सामान्य कुटुंबाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे. दुसरीकडे बाजारात नवीन मूंग, उडीद, सोयाबीन शेतीमाल विक्री साठी आले असले तरी बाजार समिती यार्डात सोयाबीनला उत्पादन खर्चाच्या तुलनेत कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आधी शेतमालाला भाव द्या, त्यानंतरच अनुदानाच्या योजना राबवा असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहे.
केंद्रीय मंत्री मंडळाने २०२४ – २५ खरीप पिकासाठी किमान आधार भूत किंमती जून मध्येच जाहीर केल्या आहेत. परंतु बाजारामध्ये सरास व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांचा माल आधार भूत किमतीपेक्षा कमी दराने सोयाबीनसह अन्य मालाची खरेदी सुरू आहे. सोयाबीन ओले असल्याचे कारण पुढे करत ३८०० ते ४१०० प्रती क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करुन शेतीमाल विक्री करण्याची वेळ आली आहे. रात्रंदिवस मेहनत शेतकऱ्यांनी करायची आणि शेतकऱ्यांच्या मालाची किंमत मात्र व्यापाऱ्याने ठरवायची ही प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे. ही प्रथा बंद कधी होणार ? असा प्रश्न आता शेतकरी करीत आहे.