परभणी (Parbhani):- जिल्ह्यात मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर दरम्यान १०३ आणि यावर्षी जानेवारी ते जून दरम्यान ३१ असे मिळून दिड वर्षात एकूण १३४ शेतकर्यांनी आत्महत्या (suicide) केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
एकूण १०३ शेतकर्यांनी विविध कारणांमुळे आत्महत्या
जिल्ह्यात विविध कारणांनी शेतकरी आत्महत्या होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सततचा दुष्काळ(drought), अतिवृष्टी(heavy rain), नापिकी आणि बँकेचा कर्ज वसूलीसाठी सततचा तगादा आदी कारणांमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे सुपिक व काळी जमीन जिल्ह्यात असूनही शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्व तालुक्यांत मिळून एकूण १०३ शेतकर्यांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामधील ५९ आत्महत्या केलेले शेतकरी सरकारी मदत मिळण्यास पात्र झाले आहेत. तर ४४ शेतकरी आत्महत्या प्रकरणे अपात्र करण्यात आली आहे. तसेच चालू वर्षातील जानेवारी ते जून दरम्यान आत्महत्या केलेल्या ३१ शेतकर्यांपैकी केवळ ९ शेतकरी आत्महत्या प्रकरणे मदतीस पात्र झाले आहेत. तर ५ शेतकरी आत्महत्या अपात्र करण्यात आली आहे. तर एकूण १७ शेतकरी आत्महत्या प्रकरणे प्रलंबीत आहेत.
शेतकरी जगला पाहिजे यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत
अन्नदाता शेतकरी जगला पाहिजे यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र, तरीही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे दिसून येत आहे. आत्महत्या केल्याच्या प्रमुख कारणांमध्ये सततची नापिकी, बँकेचा कर्ज वसुलीसाठी लावलेला तगादा, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ (dry drought) आदींचा समावेश आहे. राज्य शासनाच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबास सरकारी मदत दिली जाते. मात्र ती तात्पुरती मलमपट्टी असल्याचे वारंवार दिसून आले आहे.