महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ परभणीत सभा
महायुतीच्या भ्रष्ट कारभारावर सोडले कडक टिकास्त्र
देशोन्नती वृत्तसंकलन
परभणी (Uddhav Thackeray) : भाजपा हा आता संकरित पक्ष झाला आहे. निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांना सुध्दा आता तो नकोसा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचे लचके तोडत आहेत. त्यांना महाराष्ट्र म्हणजे नोटा छापण्याचे मशीन वाटत आहे. सगळे प्रकल्प गुजरातला जात आहे. इथला तरुण, शेतकरी निराश झाला आहे. महिलांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मात्र शेतकरी, महिलांनो खचून जाऊ नका, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली.
परभणी शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात महाविकास आघाडीचे उमेदवार आ. डॉ. राहूल पाटील, आ. सुरेश वरपूडकर, माजी आ. विजय भांबळे, विशाल कदम यांच्या प्रचारार्थ शनिवारी आयोजित प्रचारसभेत उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी मंचावर खा. संजय जाधव, खा. फौजिया खान, आ. सुरेश वरपुडकर, माजी आ. सुरेश देशमुख, माजी आ. विजय गव्हाणे, माजी आ. मधुसुदन केंद्रे, माजी आ. मिराताई रेंगे, डॉ. विवेक नावंदर, गंगाप्रसाद आनेराव, सभापती पंढरीनाथ घुले, पै. मारोती बनसोडे, प्रा. किरण सोनटक्के, रविराजदेशमुख, नदू आवचार, जाकिर लाला, नदीम इनामदार आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, परभणीत आल्यावर मला माझ्या होम पिचवर आल्या सारखे वाटते. कारण तुम्ही सर्व शिवसैनिकांनी आणि खा. संजय जाधव, आ. डॉ. राहूल पाटील यांनी गद्दारीचा किडा या गडाला लागू दिला नाही. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. तुम्हा सर्वांच्या ताकदीवरच महाराष्ट्रासाठी मी लढतोय. गद्दारापुढे कधीही झुकणार नाही, वाकणार नाही. महायुतीकडे प्रचाराचे कोणतेही मुद्दे राहिले नाहीत. राज्यात विधानसभा निवडणूका होत असताना देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह प्रचारात उतरले आहे. वाट्टेल ते आरोप करत आहेत. देशात महिलांची आब्रु लुटली जात आहे.आणि हे इकडे येऊन प्रचार करत आहेत.
कोट्यवधींची कामे महाराष्ट्रात आणि देशात केल्याचा कांगावा केला जात आहे. मात्र ही कामे स्वतःच्या फायद्यासाठी केली. कोट्यावधींचा भ्रष्टाचार यात केला. छत्रपतींच्या पुतळ्याच्या कामात या लोकांनी पैसा खाल्ला, राम मंदिर, संसद भवनाला गळती लागली आहे. बदलापूर प्रकरणात पिडित मुलीच्या आईवडीलांची तक्रार घेतली जात नाही. ही सगळी थेर संपावायची वेळ आली आहे. महाराष्ट्रात नक्की परिवर्तन होणार आहे. या लढ्यात महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करुन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले. यावेळी आ. सुरेश वरपूडकर, खा. संजय जाधव, खा. फौजिया खान यांनी मनोगत व्यक्त केले.