ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांचे निर्देश
हिंगोली (Farmers Yojana) : शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात (Farmers Yojana) शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्र.जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी ॲड. हेलोंडे-पाटील म्हणाले, मराठवाड्यात मागच्या वर्षी चाऱ्यांची कमतरता होती. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता पाहून गायरान जमिनीवर जास्तीत जास्त चारा लागवड करुन तो (Farmers Yojana) शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावा. यामुळे जिल्ह्यातील उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे गहाण असल्यास त्या सोडवून द्याव्यात.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावाचे दरफलक दर्शनी भागात लावावेत. शेतमाल तारण योजनेची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचार, प्रसिध्दी करावी. वन्य प्राण्यांच्या नुकसानीचा मोबदला देण्यासाठी शिबिरे घेऊन जनजागृती करावी. यासाठी ऑनलाईन भरण्यात येणाऱ्या अर्जासाठी गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर सहकार्य करावे. तसेच प्रेरणा प्रकल्पांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे तसेच आत्महत्या होऊ नये यासाठीही समुपदेशन करावेत. त्यांच्यावर मोफत उपचार करावेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत असल्याची खात्री करावी.
तसेच कौशल्य विकास विभागाच्या योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलापर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची माहिती ग्रामस्तरावर उपलब्ध करुन द्यावी. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत मैदान विकसित झाले पाहिजेत. शाळेमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. आदिवासी विकास विभागाच्या योजना, एमआयडीसीच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. (Farmers Yojana) शेतकऱ्यांच्या बांधावर जैविक प्रयोगशाळेची उभारणी करुन शेतीसाठी लागणारी जैविक खते, वस्तू घरच्या घरी तयार करण्याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करावे. आकाशातून पडणाऱ्या विजांपासून वाचण्यासाठी दामिनी ॲपच्या वापराची माहिती, हवामान विषयक उपक्रमाची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवावी. प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या प्रतिनिधीची मोबाईल क्रमांकासह यादी ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावावी. यासह शासनाच्या इतर (Farmers Yojana) सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामस्तरावर शिबिरे घेऊन जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी प्र.जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याची संक्षिप्त माहिती दिली. तसेच सर्व संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांनीही राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. बैठकीस उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोल, विभागीय वन अधिकारी डॉ. आर. पी. नाळे, पशुसंवर्धन उपायुक्त सखाराम खुणे, जिल्हा उपनिबंधक एस. एल. बोराडे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.