हिंगोली जिल्ह्यातील वाघजाळी येथील धक्कादायक प्रकार
हिंगोली (Microfinance Loan Recovery Case) : मायक्रो फायनान्स आणि खासगी फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून हिंगोली जिल्ह्यातील वाघजाळी येथील भूमिहीन शेतमजूर धम्मरत्न काळुराम मोरे आणि समाधान प्रल्हाद मोरे यांनी आपले राहते घरच विक्रीला काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नाही आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले असताना (Microfinance Loan Recovery Case) फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी दररोज घरी जाऊन हप्त्यासाठी तगादा लावतात. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतरही अपमानास्पद वागणूक देऊन घरदार विकून पैसे भरा अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप पीडित शेतमजुरांनी केला आहे. मानसिक तणावातून अखेर त्यांनी राहते घर विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकारावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. वाघजाळी येथील शेतमजुरांवर घर विकण्याची वेळ येत असेल तर सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला खाली करून या शेतमजुरांना राहण्यासाठी जागा द्यावी, असा घणाघात त्यांनी केला.
राज्यात फायनान्स कंपन्यांच्या जाचामुळे नागरिकांना टोकाचे पाऊल उचलावे लागल्याच्या आणि हिंसक घटना घडल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. तरीही वसुलीच्या पद्धतींवर नियंत्रण का आणले जात नाही, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर कठोर कायदा करून मायक्रो फायनान्सच्या बेकायदेशीर व जाचक वसुलीला आळा घालावा, दुष्काळग्रस्त भूमिहीन शेतमजुरांना तातडीने दिलासा द्यावा आणि छळाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. जिल्ह्यात अशी परिस्थिती असताना आमदार, खासदार आणि पालकमंत्री भूमिहीन शेतमजुरांच्या प्रश्नावर चकार शब्द काढायला तयार नाहीत, झेंडा मंत्री म्हणून ओळख असलेले पालकमंत्री या मुद्द्यावर बोलतील का, असा सवालही कावरखे यांनी केला आहे.
वाघजाळी येथील संकट हे केवळ दोन कुटुंबांचे दुःख नसून राज्यातील असंख्य गरीब कुटुंबांच्या जगण्याचा प्रश्न आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून न्याय दिला नाही आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचावर नियंत्रण आणले नाही तर तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गजानन कावरखे यांनी दिला आहे.