पुणे (Pune Female Feticide) : एका मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यानेच वैद्यकीय गर्भपात कायद्याचे (एमटीपी) उल्लंघन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानेच असे अवैध प्रकार केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोपी वैद्यकीय अधिकारी डॉ. माया पवार असून, त्या अनेक वर्षांपासून या कायद्याचे उल्लंघन करून, असे अवैध प्रकार करत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
पुण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी सांगितले की, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्याने गुन्हा केल्याची ही पहिलीच घटना आहे. ‘एमटीपी’ कायद्याचे उल्लंघन केल्यास स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणी मोठा दंड आणि दोन ते सात वर्षांपर्यंत कारावास होण्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागानुसार, तळेगाव येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रीसर्च (एमआयएमईआर) रुग्णालयाने जिल्हा शल्य चिकित्सकांना या प्रकरणी संपर्क साधला. डॉ. माया पवार यांनी आशा सेविकेच्या साहाय्याने रुग्णाला गर्भपातासाठीच्या गोळ्या दिल्या होत्या. त्यामुळे गर्भवतीची प्रकृती गंभीर झाली. महिला चार महिन्यांची गर्भवती होती. कायदेशीर गर्भपातासाठी बारा आठवड्यांच्या गर्भधारणेची मुदत पूर्ण करावी लागते.
यामागील वैद्यकीय जोखमीची संपूर्ण कल्पना असतानाही डॉ. माया पवार यांनी महिलेस ‘एमटीपी’ गोळ्या देण्याची परवानगी दिली. या अवैध कृत्यामुळे संतापलेल्या शल्य चिकित्सक यांनी आता मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना आरोपीला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाईसह, फिर्यादीद्वारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.