परभणी(Parbhani) :- शाळेत घडलेल्या प्रकारानंतर दोन लाख रुपये द्या नाहीतर तुमची शाळा बंद करेल, तुमच्या नवर्याला नोकरी करु देणार नाही, असे म्हणत महिला मुख्याध्यापिकेस खंडणीची (Extortion) मागणी करुन विनयभंग करण्यात आला. ही घटना परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दित घडली. या प्रकरणी ३० मे रोजी एकूण सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भेटण्यासाठी गेल्या असता त्यांना दमदाटी करत विनयभंग
व्यवसायाने मुख्याध्यापिका असलेल्या ३८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. आरोपींपैकी एका महिलेची दोन मुले फिर्यादीच्या शाळेत शिकायला आहेत. त्यांच्याकडे शालेय शुल्काची रक्कम बाकी आहे. या रक्कमेची मागणी केल्यावर आरोपीने फिर्यादी सोबत वाद घातला. याच दरम्यान फेब्रुवारी २०२४ मध्ये आरोपीने फिर्यादीला माझ्या मुलासोबत शाळेत गैरप्रकार(malpractice) झाल्याचे सांगितले. यावेळी शाळेत असलेल्या सीसीटिव्हीची पाहणी केल्यावर कोणताही प्रकार पुढे आला नाही. यानंतर आरोपी मुलांना घेवून गेले. त्याच दिवशी दुपारच्या सुमारास फिर्यादीला पोलीस स्थानकात बोलावण्यात आले. पोलीस स्टेशन(Police station) परिसरात भेटलेल्या दुसर्या एका आरोपीने दोन लाख रुपये देवून प्रकरण मिटवा अन्यथा तुमची शाळा बंद करेल, अशी धमकी दिली. वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. याच दरम्यान आरोपींनी फिर्यादीला भेटण्यासाठी बोलावले. फिर्यादी भेटण्यासाठी गेल्या असता त्यांना दमदाटी करत विनयभंग(molestation) करण्यात आला. ४ एप्रिल रोजी दोन आरोपींनी फिर्यादीच्या गैरहजेरीमध्ये शाळेसमोर येऊन त्यांना गोळ्या घालून ठार मारेल, अशी धमकी दिली. या प्रकरणात कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींमध्ये वकिल, बीएसएफचा जवान
खंंडणी आणि विनयभंगाच्या प्रकरणात कोतवाली पोलिसात गुन्हा नोंद झाला. एकूण सहा आरोपी आहेत. यामध्ये तीन वकिल, दोन सामान्य व्यक्ती आणि एक जण बीएसएफचा जवान आहे. कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहेत.