मूर्तिजापूर (Fierce Animal) : अलीकडेच जामठी, दहातोंडा शिवारात वाघसदृश हिंस्र प्राणी आढळून आला आहे. दरम्यान, ३ फेब्रुवारीला निंबा शिवारात दोन वन्यप्राणी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात उमा प्रकल्प शाखा अभियंता नि.रा. चव्हाण यांनी तहसीलदार मूर्तिजापूर यांना लेखी माहिती दिली आहे. तालुक्यात दिवसागणिक हिंस्त्र प्राण्यांची दहशत वाढली असून अनेक भागात लोकांना हिंस्र प्राणी आढळून येत असल्याने शेतकर्यांत मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जामठी, हातगाव, दहातोंडा, या शिवारात रोज कुठेतरी हे हिंस्त्र पशू (Fierce Animal) आढळून येत असताना सोमवारी दुपारी १२ वाजेदरम्यान हर्षल मोगरे याला शेतात दोन हिंस्र पशू आढळून आले. सध्या उमा प्रकल्पातून शेतीसाठी कालव्यातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे, त्यासाठी शेतकरी शेतात गव्हाला पाणी देण्यास जातात. परंतु या प्राण्यांची धास्ती शेतकर्यांनी घेतली असल्याने परिसरातील शेतीची अनेक कामे खोळंबली आहेत. या प्राण्यांचा तातडीने शोध घेऊन जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तहसीलदारांना दिले लेखी पत्र
सद्यस्थितीत उमा प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रामध्ये पाणीपाळी आवर्तने सुरू आहेत. ३ फेब्रुवारीला १२ वाजता निंबा येथे या शाखे अंतर्गत कार्यरत असलेले कालवा निरीक्षक अंकुश जाधव व इतर ग्रामस्थ यांच्याकडे धाव घेत निंबा येथील रहिवासी हर्षल मोगरे यांनी कालवा क्षेत्रात वाघसदृश प्राणी असल्याबाबत सांगितले. ही बाब वन विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात यावी, जेणेकरून वन विभागाकडून या प्राण्यास अटकाव करण्यात येईल, असे उमा प्रकल्प शाखा अभियंता यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांना दिलेल्या लेखी माहिती पत्रात म्हटले आहे.
दोन प्राणी दिसल्याची माहिती तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली. माहिती मिळताच वनरक्षक चाऊस यांना घटनास्थळी पाठवले होते. परंतु काहीच आढळून आले नसल्याने मंगळवारी आम्ही पुन्हा (Fierce Animal) शोध मोहीम सुरु करणार आहोत.
– अनिता बेलसरे, वर्तुळ अधिकारी वनविभाग, मूर्तिजापूर