जिंतूर(Parbhani):- मराठा आरक्षण मिळावे यासाठी मागील एक वर्षापासून संपूर्ण राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत विशेषतः मराठवाड्यात याची धग तीव्र स्वरूपात आहे. मात्र राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचना अमलात आणली जात नसल्यामुळे व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणास बसत असल्याने सरकारच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे. म्हणून जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथील 27 वर्षीय तरुणाने चिट्ठी लिहून मराठा आरक्षण मिळत नसल्याचा विवंचनेतून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री 8 : 30 वाजता उघडकीस आली असून तालुक्यातील पाचवा बळी ठरला आहे.
27 वर्षीय तरुणाची चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या
याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील किशोर ससे वय 27 हा तरुण मागील वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग होत असे विशेष करून जिंतूर तालुक्यातील मराठा आरक्षण आंदोलनात पाचेगाव अग्रस्थानी आहे. यातच काल 16 सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसत असल्यामुळे किशोर ससे हा विवंचनेत राहत होता. यातूनच त्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नातेवाईकांना समजताच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन झाडाला लटकलेल्या अवस्थेतून काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले दरम्यान किशोर ससे यांनी आत्महत्येपूर्वी हातावर लिहून व एक मराठा कोटी मराठा मी मनोज जरांगे असे चिठ्ठीवर लिहिलेले आढळून आले. घटनेची नोंद जिंतूर पोलिसांत करण्यात आली आहे मयताच्या पश्चात पत्नी दोन मुले,आई,वडील,दोन भाऊ असा परिवार आहे गावातील तरूणाने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.