मानोरा(Washim):- घरकुलाचा दुसरा व तिसरा हप्ता द्यावा यासाठी वारंवार कळवूनही दखल न घेतल्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी बुधवारी दि. ९ ऑक्टोंबर पासून गटविकास अधिकारी मानोरा यांच्या कार्यालयात घरकुलच्या हप्यासाठी इंझोरी येथील लाभार्थी व महाविकास आघाडी च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व घरकुल धारक लाभार्थ्यांना येत्या चार दिवसात बांधकाम पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांना रक्कम खात्यात जमा करण्याचे लेखी पत्र पत्र दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
येत्या चार दिवसात खात्यात रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासन
मोदी आवास योजनेअंतर्गत (Modi Awas Yojana) घरकुल धारकांनी पहिला हप्ता १५ हजार मिळाल्यानंतर घरांचे काम चालू केले. आजपर्यंत ७ ते ८ महिने उलटून गेले परंतु अजूनही घरकुलचा २ रा व ३ रा हप्ता मिळाला नाही. घरकुल मिळाल्याने आम्ही आमचे घरे पाडली. आज हप्ता न मिळाल्याने आम्हाला राहायला घर नाही. आम्ही कर्जबाजारी झालो आहे. याबाबत घरकुलाचा हप्ता मिळावा यासाठी २० सप्टेंबर रोजी विनंती अर्ज दिला होता, परंतु शासनाने आमच्या अर्जाची कुठेही दखल घेतली नाही म्हणून आम्ही गावकरी व महाविकास आघाडीच्या वतीने आठवडी बाजाराच्या बुधवारला गटविकास अधिकारी मानोरा यांच्या कार्यालयात कुटंबनिशी ठिय्या आंदोलन करण्यासाठी आले असता येत्या चार दिवसात बांधकाम पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांना २ व ३ रा दिला जाईल, असे बिडीओ यांनी पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महाविकास काँग्रेस (Congress) जिल्हा कमिटीचे प्रभारी देवानंद पवार, रविंद्र पवार, मधुसूदन राठोड, देवानंद हळदे, विकास चौधरी यांच्यासह लाभार्थी कमलाबाई राऊत, भगवान हरमकर, कमला शंकर राठोड आदीसह इतर लाभार्थी उपस्थित होते.