हिंगोली (Hingoli medical college) : येथे नव्याने सुरू होणार्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर परवानगी मिळाली असून चालू शैक्षणिक वर्षात १०० विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळणार आहे. याबद्दल हिंगोलीतील व्यापारी, पत्रकार व नागरिकांनी आतिषबाजी करून जल्लोष केला. दिवंगत खासदार अॅड. राजीव सातव यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेले हिंगोलीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दोन वर्षांपासून रखडले होते. मागील वर्षी जागा हस्तांतरीत न झाल्यामुळे (Hingoli medical college) महाविद्यालय सुरू होऊ शकले नाही. यावर्षी सुद्धा अनेक त्रुट्या काढून शासना तर्फे परवानगी थांबविण्यात आली होती.
यामुळे शासन व प्रशासना विरूद्ध नागरिकांत मोठी नाराजी व्याप्त झाली होती. दैनिक देशोन्नतीने हा विषय उजेडात आणताच स्थानिक व्यापारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट जनआंदोलनाचा इशारा देऊन टाकला. दरम्यान, (Hingoli medical college) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.श्रीचक्रधर मुंगल यांनी विभागीय स्तरावर चांगलाच पाठपुरावा केला. शेवटी सोमवारी रात्री उशिरा याबाबत शासनाने मंजुरीचा निर्णय कळविला.
मंगळवारी या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी गांधी चौकात आतिषबाजी करून जल्लोष केला. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, अनिल नैनवाणी, वसंत भट्ट, अ.माबुद बागवान, शेख नईम शेख लाल, सुरेश अप्पा सराफ, रविंद्र सोनी, प्रशांत सोनी, शाम खंडेलवाल, माजी नगराध्यक्ष जगजीतराज खुराणा, शेख नौमान, निरज देशमुख, मिलींद उबाळे, प्रकाश इंगोले, सुमित चौधरी, प्रविण भट्ट, प्रमोद मुंदडा, प्रशांत उर्फ गोल्डी सोनी, प्रशांत बाहेती यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.