परभणी (Parbhani):- जिल्हा आणि शहरात प्रॅक्टिस करणार्या पहिल्या महिला डॉक्टर डॉ. सुनंदा मंत्री यांची रविवार १५ डिसेंबर रोजी प्राणज्योत वयाच्या ९६व्या वर्षी मालवली. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह मेडिकल कॉलेजला (Medical College)शिकणार्या मुलांसाठी मंत्री कुटूंबियांनी उपलब्ध करून दिला गेला.
देहदान चळवळ गतीमान होणे काळाची गरज
जून्या पिढीतील जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉ. सुनंदा लक्ष्मीनारायण मंत्री यांचे वसमत रोडवरील मंत्री कॉम्प्लेक्सधील निवासस्थानी रविवार १५ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा संजय मंत्री, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. सुनंदा मंत्री यांची देहदानाची (body donation) इच्छा होती. ती त्यांनी कुटूंबाकडे व्यक्त केली होती. तुमची आंतरिक इच्छा असेल शिवाय तीच अंतिम इच्छा असेल तर परिस्थिती आणि नियती साथ देतेच. आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प मुलगा संजय मंत्री यांनी केला. सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. किशोर सुरवसे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश लखमावार, डॉ.रामेश्वर नाईक, डॉ. बाहुबली लिंबळकर, डॉ. विवेक नावंदर आणि मेडिकल कॉलेजचा स्टाफ असलेला चंद्रकांत कवठेकर, डॉ. प्रज्ञा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार्या पहिल्या वाहिल्या देहाचे स्वागत करुन देह स्वीकारला.पद्मराज एनर्जी इंडिया लिमिटेड प्रकल्पाचे संचालक संजय मंत्री यांच्या त्या मातोश्री होत. दरम्यान जिल्ह्यात विनोद डावरे यांनी देहदानाची चळवळ उभी केली आहे. त्यांच्या या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र अजून व्यापक प्रमाणात देहदानाची जनजागृती होणे आवश्यक आहे.