तुमसर(Bhandara) :- यंदा झालेल्या समाधानकारक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडूंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात ९० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून काही प्रमाणात दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याचा फायदा महाराष्ट्र(Maharashtra) आणि मध्यप्रदेशासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत आहे.
18 जानेवारीपासून होणार बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग
महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. यावर्षीच्या पावसाच्या पाण्याने हा प्रकल्प तब्बल १०० टक्के भरला होता. यापूर्वी या प्रकल्पातून खरीप हंगामात धान पिकांसाठी काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. दरम्यान यंदाच्या उन्हाळी रब्बी हंगामाची चाहुल लागताच बावनथडी प्रकल्पाचे पाणी धानपिक लागवडी करीता मिळणार असल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी(Farmers) धान नर्सरीची शेतात पेरणीला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता धानपीक नर्सरी करीता प्रकल्पाचे पाणी आवश्यक असल्याने येथील नागरिकांनी प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी देखील केली. सदर शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेत तुमसर-मोहाडी विधानसभेचे आ. राजू कारेमोरे यांच्या पाठपुराव्याने बावनथडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून १८ जानेवारी रोजी पासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता बडोले यांनी दिली.
यंदाच्या उन्हाळी हंगामात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे
तुमसर-मोहाडी तालुक्यातील १७ हजार हेक्टर सिंचित शेतजमीनीचा उद्दिष्ट असलेल्या बावनथडी प्रकल्पातून यंदाच्या उन्हाळी हंगामात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यात तुमसर-मोहाडी तालुक्यातील रोटेशन नुसार शेतकऱ्यांची प्रत्यक्षात साडे पाच हजार हेक्टर शेतजमीन सिंचित होणार असल्याने येथील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना सूजलाम सुफलाम करू पाहणाऱ्या बावनथडी प्रकल्पाचा पाया महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने गेल्या ३५ वर्षापुर्वी बावनथडी प्रकल्पाचा पाया रोवला गेला. यावर्षी समाधान कारक पाऊस झाला असल्याने खरीप हंगामात धान पिक लागवडी करीता बावनथडी प्रकल्पाचे पाणी, शेती सिंचनाकरीता सोडण्यात आले होते. तर आता ज्या शेतकऱ्यांना मागील काळात उन्हाळी हंगामात धानपिक लागवडी करीता पाणी देण्यात आले होते त्या शेतकऱ्यांना यंदा शेती सिंचन करता येणार नसल्याची माहीती आहे.
रोटेशन पध्दतीने यंदाच्या हंगामात 24 गावातील शेतीला मिळणार पाणी
ज्यांना मागच्या वर्षी उन्हाळी हंगामात धानपिक लागवडी करीता पाणी मिळाले नाही अशाच शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता यंदा उन्हाळी रब्बी हंगामात साडे पाच हजार हेक्टर शेतजमीन सिंचित होणार आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात आंबागड, दावेझरी, हरदोली, टाकला, हिंगणा, काटेबाम्हणी, हसारा, खापा, विहिरगाव मांगली, तामसवाडी, परसवाडा, तुडका, स्टेशनटोली, देव्हाडी, मांढळ, रोहा, बेटाळा, रोहना, तुमसर, नवरगाव, बोरी, उमरवाडा, शिवनी असे एकूण २४ गावांतील शेतजमीन सिंचित होणार आहे. येथे बावनथडीच्या कालव्यातून शेवटच्या टोकावर पाणी पोहोचते.
मात्र काही ठिकाणी टेलवर अद्यापही पाणी पोहचत नसल्याची आजही ओरड कायम आहे. तर प्रकल्पानजिकच्या गावांना सुध्दा शेती सिंचनाचा लाभ सुध्दा मिळत नसल्याची खंत स्थानिक नागरीक करीत आहेत. यावर संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी उपाययोजना करण्याची गरज आहे.