शहरातील विजय नगरातील घटना
अग्निशमन विभागाने आग आणली आटोक्यात
देशोन्नती वृत्तसंकलन
अकोला (Cylinder Explosion) : शहरातील रामदासपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील विजयनगर येथे सोमवार, २ डिसेंबर रोजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने या स्फोटामध्ये पाच घरे जळून खाक झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले होते.
अकोला शहरातील विजयनगर येथे सिलिंडरचा स्फोट झाला. या (Cylinder Explosion) स्फोटामध्ये तब्बल पाच घरांची राखरांगोळी झाली. घरातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन बंबानी घटनास्थळी धाव घेऊन सदर आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले होते, तर एक पोलिस कर्मचारीदेखील जखमी झाल्याची माहिती आहे. या घरांचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना तातडीने अनुदान देण्याची मागणी विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी केली आहे. या आगीची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली होती.
आ. साजीदखान यांची घटनास्थळी तत्काळ धाव
विजय नगर येथील बजरंग चौक भागात (Cylinder Explosion) गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत तब्बल पाच घरे जळून खाक झाली. सदर घटनेची माहिती मिळताच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजीदखान पठाण यांनी घटनास्थळ गाठत नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेत प्रशासनाशी समन्वय साधत उचित मदत करण्याची मागणी केली. या आगीत जीवनावश्यक वस्तू या आगीत जळून खाक झाल्या.
स्फोटातील पीडितांना भाजपा करेल आर्थिक मदत
विजय नगर बजरंग चौकात झालेल्या गॅस स्फोटातील पीडितांना भाजपाने प्रत्येकी दहा हजाराची आर्थिक मदत देण्याचे अभिवचन दिले आहे. तसेच याप्रकरणी चौकशी होऊन गॅस कंपनीने, शासनानेही मदत द्यावी, असे निर्देश भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय अग्रवाल यांनी दिले. या (Cylinder Explosion) स्फोटामध्ये संजय ढवळे, रवी गायकवाड, निंबाबाई निंबे, अक्षय अरुळकर, राजेश घामोडे यांच्या घराचे नुकसान झाले. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांच्या माध्यमातून पीडितांना शासनस्तरावरून मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही देण्यात आली.