हिंगोली(Hingoli):- हिंगोली शहरातील आझम कॉलनी भागात हिट अँड रन चा प्रकार घडला असून या प्रकरणात पाच जण जखमी झाले आहेत, यामध्ये एका जणांचे प्रकृती गंभीर (serious) असून त्याला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने कारची तोडफोड केली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी ४ जुलैला सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.
कारची एका व्यक्तीला धडक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आझम कॉलनी भागामध्ये एका कारचालकाने बुधवारी ३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात कार चालवली. त्यामुळे कारची एका व्यक्तीला धडक बसली. यामध्ये संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली. या प्रकारामुळे घाबरलेल्या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण (Control) सुटले. त्याने घटनास्थळावरून कार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कारवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे कारसमोर येणाऱ्या चार ते पाच जणांना धडक बसली.
जमावातील काही जणांनी केली कारची तोडफोड
त्यानंतर ही कारचालकाने कार पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी एकत्र आलेल्या संतप्त जमावाने कार रोखली. त्यानंतर कारचालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावातील काही जणांनी कारची तोडफोड ही केली. या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार संजय मार्के, शेख अमजद, अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, गणेश लेकुळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवले. पोलीस आल्यानंतर जमाव पांगला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात (government hospital) दाखल करण्यात आले. मात्र त्याच्या पायाला गंभीर दुखापत असल्याने प्राथमिक उपचार (Treatment) करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी असलम बेगम मिर्झा यांनी आज सायंकाळी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी कार क्रमांक एम एच 38 व्ही 0350 च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अमजद शेख हे करीत आहेत.