हिंगोली (Hingoli Municipality) : शहरात झालेल्या ढगफुटीमुळे संपूर्ण हिंगोली शहरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी मा. अभिनव गोयल यांनी पूरग्रस्त ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून (Hingoli Municipality) हिंगोली नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना सूचना देऊन तत्काळ पूरग्रस्तस्थिती आटोक्यात आणण्याचे व नागरिकांची योग्य ती सुविधा करण्याचे निर्देश दिले. पूरस्थितीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे शहरात साथीचे रोग, डेंगूची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरामध्ये सदर रोगांचा वाढता प्रादुर्भाव होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व स्वच्छतेची कामे करणे गरजेचे आहे.
यावर मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंढे हे लगेच अॅक्शन मोडवर येऊन अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेत शहरात युद्धपातळीवर पूरग्रस्त भागात व संपूर्ण हिंगोली शहरात स्वच्छतेची कामे व साथीचे रोग पसरू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी औषध फवारणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शहरात प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचारी व JCB च्या सहाय्याने युद्धपातळीवर स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच पूरस्थितीमुळे साथीचे रोग, डेंगू, मलेरिया सारखे आजार नागरिकांना व लहान मुलांना होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करून ट्रॅक्टरद्वारे व फवारणी यंत्राद्वारे औषध फवारणी करण्याचे काम सुरु केले आहे.
नागरिकांनी सदर पूरस्थितीला घाबरून न जाता यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. घर कोरडे ठेवावे जेणेकरून डासांची निर्मिती होणार नाही. कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच घरघुती वापरातील पाण्याच्या टाक्या, हौद, बॅरल ई. साहित्य घट्ट झाकण लावून ठेवावीत.भंगार सामान,निरुपयोगी टायर्स यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी यामध्ये पाणी साचू देऊ नये,फुलदाण्यातील पाणी स्वच्छ करावे, झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठू देऊ नये कारण अश्या ठिकाणी सदर डासांची उत्पती होत असते. झोपतांना कीटनाशक भरीत मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम,अगरबत्तीचा वापर करावा, अंगभर कपडे घालून झोपावे, ताप आल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत रक्त नमुना तपासून घ्यावा व घाबरून न जाता आवश्यक औषधोपचार करावा. लहान लेकरांची काळजी घ्यावी. असे आवाहन (Hingoli Municipality) नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी हिंगोली शहरातील नागरिकांना केले आहे.