हिंगोली(Hingoli):- एकीकडे पोलिसांकडून मटका जुगारावर छापे मारले जात असताना आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी भल्या पहाटे वसमत शहरातील काशीपुरा भागात एका घरावर छापा टाकून ३ लाख १५ हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्ती विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला आहे.
वसमत शहरात तीन लाख पंधरा हजाराचा गुटखा जप्त
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्रीकृष्ण कोकाटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात अवैध धंदे (Illegal business)खपवून घेतले जाणार नाही असा गर्भित इशारा देऊन तेरा ही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात अवैध धंद्यावर छापे मारण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार यापूर्वी अनेक ठिकाणी चोरीछुपे मार्गे चालणाऱ्या झन्ना मन्ना जुगार तिरट यासह मटका जुगार आदींवर छापे मारून गुन्हे दाखल करण्यात आले. आता पोलिसांनी अवैध गुटक्यांकडे मोर्चा वळविला आहे. वसमत येथील रेल्वेस्टेशन (Railway station)रस्त्यावरील काझीपूरा भागातील एका घरामध्ये गुटख्याची पोती साठवून ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरून आज ३० ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजता गुन्हे शाखेच्या पथकाने सदर घरावर छापा मारला. यावेळी घराची तपासणी केली असता त्या ठिकाणी राजनिवास गुटख्याचे तीन मोठे पोते, राजनिवास गुटख्याच्या ४ बॅग, वजीर गुटख्याच्या ४ बॅग, गोवा गुटख्याचे ३० पुडे, वजीर गुटख्याचे ३५ पुडे, विमल गुटख्याच्या ५ बॅग आढळून आल्या. या सर्व गुटख्याची किंमत ३ लाख १५ हजाराचा आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर गुटखा जप्त केला आहे.
एका विरुद्ध वसमत शहर ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी जमादार आकाश टापरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात इमरानखान आय्युबखान पठाण (रा. काझीपूरा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक कसबेवाड पुढील तपास करीत आहेत. ही कामगिरी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, हरीभाऊ गुंजकर, नरेंद्र साळवे, शेख हकीम, शेख नय्यर, राठोड, महिला पोलीस कर्मचारी सीता पोले यांच्या पथकाने केली.