हिंगोली (Hingoli):- एचआयव्हीसह (HIV)जीवन जगणाऱ्या व्यक्तींना व देहविक्री करणाऱ्या महिलांना देण्यात येणाऱ्या सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव संबंधित विभागानी तात्काळ निकाली काढावेत. तसेच अतिजोखीम गट जास्त राहणा-या भागात प्रचार व प्रसिध्दी करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या.
सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढा
आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध(AIDS prevention) व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक(Surgeon) डॉ. दीपक मोरे, नोडल अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठूळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत बांगर, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, कामगार विभागाचे प्रतिनिधी एन. एस. भिसे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, नायब तहसीलदार एस.डी. बोथीकर, विहानच्या श्रीमती अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी, एचआयव्ही /टीबी पर्यवेक्षक रविंद्र घुगे, डापकुचे संजय पवार, आशिष पाटील, टीना कुंदनानी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एचआयव्ही, एड्स कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल सादर
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही, एड्स कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल सादर केला. हिंगोली जिल्ह्यात सन 2002 पासून आतापर्यंत एकूण 4 हजार 141 सामान्य गटातील रुग्णांची व 275 गरोदर महिलांची नोंद झालेली असून एकूण 3 हजार 863 रुग्णांची एआरटी केंद्रात नोंदणी झाली असून त्यापैकी 1 हजार 976 रुग्णांना औषधोपचार सुरु आहेत. तसेच सन 2023-24 मध्ये एका वर्षात एकूण 91 व्यक्ती एचआयव्ही संसर्गित आल्या असून 6 नवीन व 18 अगोदरच संसर्गित असलेल्या अशा एकूण 24 गरोदर महिला संसर्गित (infected) आढळून आलेल्या आहेत. तसेच एचआयव्ही संसर्गित महिलांच्या 15 मुलांचे 18 महिन्यानंतरच्या तपासणीमध्ये एकही बालक संसर्गित आढळून आले नाही, अशी माहिती दिली. तसेच त्यांनी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व देहविक्री(prostitution) करणाऱ्या महिलांना इतर सामाजिक लाभाच्या बाल संगोपन, संजय गांधी निराधार योजना, राशन कार्ड, बस पास, घरकुल योजना, मतदान कार्ड, इत्यादी लाभाच्या योजनाचा लाभ देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या इंडेक्स तपासणी साठी विशेष अभियान सुरु
एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या जोडीदार, त्यांच्या कुटुंबातील मुले तसेच शारीरिक संबंध आलेल्या इतर संशयित व्यक्ती र्यंत पोहोचून, त्यांची संमती घेऊन एचआयव्हीची तपासणी करण्याची विशेष इंडेक्स तपासणी मोहीम 15 एप्रिल ते 15 ऑक्टोबर, 2024 दरम्यान सुरु करण्यात आली आहे, अशी माहितीही जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिली.