हिंगोली(Hingoli):- सेनगाव तालुक्यातील पुसेगाव जिल्हा परिषद (Zilla Parishad) उर्दू शाळेत(Urdu school) शिक्षकाच्या नियुक्तीसाठी (appointment) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या दालनात सोमवारी विद्यार्थ्यांची शाळा भरविण्यात आली. या आंदोलनामुळे जि.प. प्रशासनाने तात्काळ एका शिक्षकाची नियुक्ती केली.
एक शिक्षक मागील नऊ वर्षापासून गैरहजर
पुसेगाव जिल्हा परिषद उर्दू माध्यम शाळेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असून जवळपास २५० विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देण्यासाठी सात शिक्षकांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात मात्र चारच शिक्षक कार्यरत (working) आहेत. त्यामध्ये एक शिक्षक मागील नऊ वर्षापासून गैरहजर असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. शाळेमध्ये शिक्षकांची नियुक्ती करावी यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे(Department of Education) अनेक वेळा निवेदन देऊनही त्याकडे कानाडोळा करण्यात आला. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray)गटाचे वसीम देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकार्यांनी १ जुलै सोमवार रोजी विद्यार्थ्यांसह प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार यांच्या दालनाकडे धाव घेऊन या ठिकाणी चक्क विद्यार्थ्यांची शाळा भरविण्यात आली.
शाळेवर जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांसह दालनातून उठणार नाही
याचवेळी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी पदाधिकारी आणि पालकांशी संवाद साधला; परंतु शाळेवर जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांसह दालनातून उठणार नसल्याचा पवित्रा पदाधिकार्यांनी घेतला. त्यामुळे शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के यांनी तात्काळ एका शिक्षकाची नियुक्ती करून पुढील १५ जुलै पर्यंत आणखी एक शिक्षक देण्याचे आश्वासन (assurance) दिल्याने विद्यार्थ्यांसह पदाधिकारी व पालकांनी जि.प.सिईओंच्या दालनातील आंदोलन मागे घेतले.