परभणीच्या पाथरी मधील घटना, आज पाथरी बंदचे आवाहन
परभणी/पाथरी (MLA Babajani) : शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर त्याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात आधी आकस्मित मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर मृताजवळ सुसाईड नोट आढळल्यामुळे सायंकाळी उशिरा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह शहरातील एका अन्य व्यक्तीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
एका इसमाची आत्महत्या; पाथरीत तणाव
शहरातील जेष्ठ नागरिक बी.एस.कांबळे यांचा मृतदेह मंगळवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्या शेतातील आखाड्यावर आढळून आला होता. मयताचा मुलगा अजयसिंह पाथरीकर यांनी दिलेल्या तक्रारीत आ. बाबाजानी दुर्राणी यांनी व्यवहारात फसवल्याने माझे वडील सतत ताणतणावात असायचे आणि त्यामुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली असल्याचे नमूद केले. त्यानुसार माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व विजय प्रभाकर वाकडे रा.भिमनगर पाथरी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद पाथरी पोलिसात करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात सकाळी आकस्मिक मृत्यू चा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पंचनामा करतांना पोलिसांना त्यांच्या खिश्यात चिठ्ठी आढळून आली. त्यात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी व्यवहारातील पैसे दिले नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद असल्याने सायंकाळी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पाथरी मध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान बुधवार १४ ऑगस्ट रोजी पाथरी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
हे राजकीय षडयंत्र आहे माजी आमदार दुर्राणी
मयत हा माझा कार्यकर्ता होता. काही महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटात गेला. माझ्याकडे असतांना मी त्याला कलावंत समितीचे अध्यक्ष केले. त्याचा मुलगा नगरसेवक केला. आता शिंदे गटात गेल्यानंतरही त्याच्या मुलाशी माझे चांगले संबंध आहे. त्याच्याशी वाद होण्याचे काही कारण नाही. मानसिक छळ करण्याचा दुरवरही संबंध नाही. तेंव्हा त्याच्या मृत्यू नंतर कटकारस्थान करून राजकीय षडयंत्र केले जात असल्याची प्रतिक्रीया माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.