स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील कामांना प्रशासकीय खीळ; पोलीस ठाण्यात फिर्याद
सेनगाव (Sengaon Nagar Panchayat) : लोककल्याणाच्या उद्देशाने शासन राबवत असलेल्या योजनांमध्ये प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसत असल्याचे धक्कादायक चित्र सेनगाव नगरपंचायतीत समोर आले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत मंजूर असलेली सार्वजनिक शौचालये व मुताऱ्या उभारणीची योजना तब्बल दीड वर्षे रखडल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१६ वाजता सेनगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश दत्ताप्पा गांजरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही फिर्याद नगरपंचायत सेनगाव येथील निर्धारण व प्रशासकीय अधिकारी तथा अतिरिक्त कार्यालयीन अधीक्षक दिपीका बबनराव राऊत यांनी दिली आहे.
सेनगाव नगरपंच्यायतीत मुख्याधिकारी पदावर कार्यरत असताना स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत नवीन सार्वजनिक शौचालये व मुताऱ्या उभारणीच्या प्रशासकीय संचिका तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतरही त्यांनी या महत्त्वाच्या संचिका नियमानुसार कार्यालयात सुपूर्द न करता स्वतःकडेच ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या संचिका उपलब्ध नसल्यामुळे संबंधित कंत्राटदार (Tanuja Construction) यांना पुढील कामे करता आली नाहीत. परिणामी, शासनाची महत्त्वाची योजना केवळ प्रशासकीय अडथळ्यांमुळे रखडली. सदर संचिका सादर करण्याबाबत लेखी सूचना देऊनही त्यांनी त्या सादर केल्या नाहीत, असेही फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार २१ ऑगस्ट २०२४ ते २३ सप्टेंबर २०२५ या दीर्घ कालावधीत घडला आहे. स्वच्छतेसारख्या मूलभूत गरजेच्या योजना अशा प्रकारे अडकून पडल्याने स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अशा प्रकारची ‘फाईल दडपशाही’ होत असेल, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत. फिर्याद देण्यास झालेला उशीर आणि त्यामागील तांत्रिक कारणांचाही पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.




