परभणी (Parbhani) :- आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात सन २०२२ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत ४ हजार ५४५ रक्तजल नमुने तपासण्यात आले आहेत. यामध्ये २४ डेंग्यू (Dengue) दूषित रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूमुळे जिल्ह्यात मागील साडेतीन वर्षात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
१६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणुन साजरा करण्यात येतो
दरवर्षी १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिन (National Dengue Day) म्हणुन साजरा करण्यात येतो. डेंग्यू ताप हा आजार एडीस इजीप्टाय या नावाच्या मादी डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसा पेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. सध्या उन्हाळा सुरू असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरीक पाणी साठवून ठेवत आहेत. अशा पाण्यात एडीस इजीप्टाय डास अंडी घालतात. डेंग्यु आजारावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबर जनतेचा सक्रिय सहभाग देखील महत्वाचा आहे. सर्वांनी एकाच वेळी एका दिलाने प्रयत्न केले तर डेंग्युचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.
यावर्षी तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा
डेंग्युला हरविण्याचे उपाय करा, असे ब्रिदवाक्य ठेवण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात सन २०२२ मध्ये ८५७ रक्तजल नमुने तपासण्यात आले. २०२३ मध्ये तपासण्यात आलेल्या ९४६ रक्तजल नमुन्यात ५ डेंग्यु दुषित रुग्ण आढळले. सन २०२४ मध्ये तपासलेल्या १ हजार ८२८ रक्तजल नमुन्यात १९ डेंग्यु दुषित रुग्ण आढळले. तर सन २०२५ मध्ये ३० एप्रिल पर्यंत ९१४ रक्तजल नमुने तपासण्यात आले आहे. डेंग्यु पासून वाचण्यासाठी नागरीकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रावजी सोनवणे यांनी केले आहे.