परभणी(Parbhani) :- पंधरावा वित्त आयोग अग्नि सुरक्षा अभियानांतर्गत(Fire safety campaigns) अग्निशमन दलाचे बळकटीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत परभणी शहर महापालिकेला (City Municipal Corporation) जवळपास दोन कोटी रुपयांची चार नवीन अग्निशमन वाहने प्राप्त झाली आहेत. मंगळवार ३० जुलै रोजी दुपारी या वाहनांचे महापालिकेत अगमन झाले. आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर यांच्याहस्ते वाहनांचे उद्घाटन झाले.
अग्नि सुरक्षा अभियान अंतर्गत अग्निशमन विभागाचे बळकटीकरण
परभणी शहराची लोकसंख्या तसेच शहराचा आकार वाढत आहे. वाढत्या शहरासाठी अग्निशमन वाहनांची आवश्यकता देखील भासत होती. त्यानुसार पंधराव्या वित्त आयोगातील अग्नि सुरक्षा अभियान अंतर्गत सन २०२२- २३ मध्ये नवीन वाहन खरेदीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परभणी शहरात गंगाखेड रोडवर प्रस्तावित असलेल्या नवीन अग्निशमन केंद्रासाठी वाहने लागणार होती. मनपाने पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यानुसार महापालिकेला नवीन चार वाहने प्राप्त झाली आहेत. आग तसेच विजेमुळे लागलेली आग (fire)विझविण्यासाठी आवश्यक सुविधा सदर वाहनामध्ये आहे. मंगळवारी ही वाहने महापालिकेत दाखल झाली. आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्याहस्ते वाहनांचे उद्घाटन झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते, शहर अभियंता वसीम पठाण, यांत्रिकी विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग, अग्निशमन अधिकारी दिपक कानोडे, नगर सचिव विकास रत्नपारखे, अभियंता पवन देशमुख, मंजुर हसन, युवराज साबळे आदींची उपस्थिती होती.
अग्निशमन विभागाकडे आठ वाहने
शहर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे जुने दोन बंब आहेत. त्याच प्रमाणे एक रेस्क्यु टेंडर आणि एक फोम टेंडर आहे. नव्याने महापालिकेला चार वाहने आल्याने आता महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे आठ वाहने झाली आहेत.