परभणी/गंगाखेड (Adv. Prakash Ambedkar) : मराठा, ओबीसी आरक्षणावरून राज्यात गेल्या दोन दिवसापासून गाड्या फोडाफोडीचे वातावरण तयार झाले आहे. गाड्या फोडायच्या तर मी नाव सांगतो त्या चार नेत्यांच्या गाड्या फोडा असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी आरक्षण बचाव यात्रेच्या गंगाखेड येथील जाहीर सभेत बोलताना करत शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्याकडे इशारा केला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्याकडे इशारा
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांची आरक्षण बचाव यात्रा दि. २ ऑगस्ट शुक्रवार रोजी गंगाखेड शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जाहीर सभेस प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूत गिरणीचे चेअरमन डॉ. सिद्धार्थ भालेराव, राज्य उपाध्यक्ष तथा परभणी जिल्हा निरीक्षक प्रा. गोविंद दळवी नागोराव पांचाळ, आरक्षण बचाव यात्रा समन्वयक ॲड. अविनाश भोसीकर, आरक्षण बचाव यात्रा समन्वयक रमेश बारसकर, रमजान कुरेशी, परभणी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, माजी जि.प. सदस्य भगवान सानप, डॉ. प्रतिभा भालेराव, साधनाताई राठोड, आयोजक इंजि. सुरेश फड, माजी सरपंच गोविंदराव लटपटे, लक्ष्मण लटपटे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठा आरक्षणामुळे राज्यात ओबीसी व मराठा असे दोन तट पडले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे विधानसभेच्या २८८ जागा लढविण्याची तयारी झाली असे जाहीर करून टाकावे असे म्हणत गरीब मराठा व श्रीमंत मराठांच्या लढाईत ओबीसींचा बळी जात आहे. ओबीसींचा बळी जाऊ नये म्हणून मी त्यांच्या सोबत असल्याचे सांगत मराठ्यांचा विरोधक ओबीसी समाज नसून निजामी मराठा आहे हे मनोज जरांगे यांनी समजून घ्यावे असे असे ही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. यावेळी ओबीसी समाज बांधवांसह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही सभा यशस्वी करण्यासाठी मनोहर व्हावळे, दिगंबर घोबाळे, अमोल ढाकणे, सिद्धोधन सावंत, आकाश पारवे, प्रभाकर गायकवाड, दलित पँथरचे विकास रोडे, प्रवीण घोबाळे आदींसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.