परभणी(Parbhani):- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० या धोरणास चार वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त सोमवार २२ जुलै ते रविवार २८ जुलै पर्यंत जिल्हाभरात शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या (Department of Education) वतीने सांगण्यात आले.
परभणीत सोमवार २२ ते २८ जुलै दरम्यान आयोजन
शिक्षण सप्ताह राबविण्याबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक आशा गरूड, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनिल पोलास यांनी या बाबतचे सर्व गट शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्य व खासगी शाळांना शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवड्याच्या प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून त्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलुंचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षण सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक व धोरणकर्ते आणि भागधारक यांच्यात सहकार्य वाढण्यास मदत होणार आहे. हा शिक्षण सप्ताह अंगणवाडी केंद्रामध्ये(Anganwadi Centres) देखील राबविला जाणार असून त्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित तालुक्यातील महिला व बालविकास विभागाशी समन्वयातून अंगणवाडी केंद्रात यशस्वी आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० यास चार वर्षे पुर्ण होत असून ५ जुलै २०२० रोजी नवीन शैक्षणिक धोरणास केंद्रीय मंत्रीमंडळाने (Union Cabinet) मान्यता दिली. के.कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समितीन नेमून नवीन शैक्षणिक धोरण -२०२० तयार करण्यात आले आहे.
सप्ताहातील विविध उपक्रम
जिल्हा परिषदेच्या(Zilla Parishad), खासगी व्यवस्थापनाच्या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत सोमवार २२ ते २८ जुलै या दरम्यान शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहात सोमवार २२ जुलै रोजी अध्ययन – अध्यापन मंगळवार २३ जुलै रोजी मुलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस, बुधवार २४ जुलै रोजी क्रीडा दिवस, गुरुवार २५ जुलै रोजी सांस्कृतिक दिवस, शुक्रवार २६ जुलै रोजी कौशल्य व डिजीटल उपक्रम दिवस, शनिवार २७ जुलै रोजी मिशन लाईफ दृष्टीक्षेपात इकोक्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस आणि रविवार २८ जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात विद्यार्थ्यांना मुलभूत ज्ञानासहीत संख्या ज्ञान, कौशल्य विकास, नेतृत्व गुण, कला व क्रीडा, पोषण व अध्ययन – अध्यापनाविषयी विविध विषयांवर उपक्रमांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.