नाशिक (Nashik):- राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)अजित पवार(Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेतून कुटुंबांतील सदस्यांकडे असलेल्या चार चाकी वाहनाची अट शिथिल करावी, अशी मागणी भाजपच्या शहर उपाध्यक्षा अनिता भामरे यांनी अजित पवार यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
चार चाकी वाहनाची अट शिथिल करावी
राज्याच्या चालू अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कुटुंबांतील सदस्याकडे असलेल्या चार चाकी वाहनाची(Wheeled vehicles) अट शिथिल करावी अशी मागणी अनेक सामान्य महिलांनी फोनवरून माझ्याकडे बोलून दाखवली. आजमितीस कुटुंबांत चार चाकी वाहन शोभेचे नसून गरजेचे झाले आहे. शेतकऱ्याकडे तर ट्रॅक्टर (Tractor)सोबत पिक अप वाहन देखील असते. या वाहनातून शेतकरी आपला भाजीपाला रोजमितीस बाजार समितीत विक्रीस आणत असतो. स्वतःचे वाहन असेल तर त्याचे दोन पैसे देखील वाचतात. बेरोजगारांचे(unemployed) प्रमाण वाढत असल्याने ग्रामीण किंवा शहरी भागात अनेक युवकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी चार चाकी वाहन खरेदी केले असून त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होत असतो. त्यामुळे केवळ कुटुंबात चार चाकी वाहन आहे म्हणून लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहता कामा नये. यास्तव या निर्णयाचा फेरविचार करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून चार चाकी वाहनाची अट शिथिल करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अनिता भामरे यांनी पत्राव्दारे केली आहे.