देशोन्नती वृत्तसंकलन
परभणी/पूर्णा (Parbhani):- तुम्हाला सरकार (Govt)तर्फे पगार व धान्य मिळणार आहे, तुम्ही आमच्या बरोबर शासकीय कार्यालयात चला असे म्हणत भामट्यांनी वृध्दे जवळील दागिने काढून घेतले. २६ हजार रुपयांचे दागिने काढून घेत वृध्देची फसवणूक (Fraud) करण्यात आली. ही घटना सोमवार १३ मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पूर्णा शहरातील कमल टॉकिज परिसरात घडली. सदर प्रकरणी दोन अनोळखींवर पूर्णा पोलीस ठाण्यात(police station) फसवणुकीचा दुपारी बार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृध्देने स्वतः जवळील २६ हजार रुपयांचे दागिने काढून दिले
सखुबाई एकनाथ दंडवते यांनी तक्रार दिली असून फिर्यादी या कान्हेगाव येथील रहिवाशी आहेत. कंबर दुखीचा त्रास असल्याने त्या रुग्णालयात जाण्यासाठी १३ मे रोजी पूर्णा येथे आल्या होत्या. यावेळी त्यांना दोन अनोळखी व्यक्ती भेटले. त्यांनी आजी तुम्हाला सरकार तर्फे पगार व धान्य मिळणार आहे, तुम्ही आमच्या बरोबर शासकीय कार्यालयात चला असे म्हणाल्याने फिर्यादी त्यांच्या जवळ गेल्या. भामट्यांनी वृध्देला एका दुकानावर बसविले. हे शासकीय कार्यालय असल्याचे सांगितले. हातातील चांदीच्या बांगड्या, सोन्याची पोत काढून द्या, तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ भेटेल, असे म्हणाल्याने वृध्देने स्वतः जवळील २६ हजार रुपयांचे दागिने काढून दिले.
सदर दोन व्यक्ती दागिने घेवून निघून गेले. बराच वेळ व्यक्ती परत न आल्याने वृध्देने त्यांचा शोध घेतला. यावेळी गावातीलच एक मुलगी त्यांना भेटली. सदर मुलीने हे शासकीय कार्यालय नसून रुग्णालय (Hospital) असल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वृध्देने पूर्णा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. तपास पोउपनि. इंगोले करत आहेत.