रब्बी पिकांना याचा होणार फायदा; शेतकर्यांतून समाधान
वाकोडी येडोबा/हिंगोली (Isapur canal) : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनाकरीता पाण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याने (Isapur canal) ईसापूर धरणाच्या उजव्या प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याला १ ते २२ डिसेंबर या कालावधीत २२ दिवसांसाठी पहिले पाणी सोडण्याला मान्यता देण्यात आली आहे तर दुसरे व तिसरे आवर्तन २२ फेब्रुवारी पर्यंत ईसापूर उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे प्रस्तावित मान्यता देण्यात आल्याने रब्बी पिकांना याचा फायदा होणार आहे.
ईसापूर धरणातील (Isapur canal) १५ ऑक्टोंबरच्या सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेऊन धरणातील ९६४.१० दलघमी शंभर टक्के जिवंत पाणी साठ्यावर आधारित रब्बी हंगामातील तीन पाणी पाळ्या उन्हाळी हंगामात चार पाणी पाळ्या देण्याच्या नियोजनास मान्यता मिळाली आहे. ईसापूर प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील लाभधारकांना व धरण जलाशय, अधिसूचित नदी, नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाहित व मंजूर उपसा सिंचना योजना धारकांनी रब्बी हंगामातील हंगामी, दुरहंगामी तसेच इतर उभी पिके या पिकाकरीता कालव्याचे प्रवाहित, कालव्यावरील उपसा, नदी, नाल्यावरील मंजूर उपसा, सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास मागणी अर्ज नमुना ७ अ मध्ये भरून शाखा कार्यालयात सादर करणे शेतकर्यांना बंधनकारक आहे.
ईसापूर डावा कालवा (Isapur canal) व ईसापूर उजवा कालवा व त्या अंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणी पातळीच्या कालवा संचालनालयाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात मान्यता देण्यात आली आहे. पहिली पाणी पाळी १ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली असून सन २०२४-२५ च्या रब्बी हंगामासाठी तीन अवर्तनामध्ये पाणी सिंचनाकरीता पाणी पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. पहिले आवर्तन १ ते २२ डिसेंबर या कालावधीत २२ दिवस तर दुसरे अवर्तन १ ते २२ जानेवारी २०२५ या २२ दिवसाच्या कालावधीत नंतर तिसरे अवर्तन १ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत २२ दिवस असे एकूण ६६ दिवस ईसापूर उजव्या व डाव्या कालव्यातून शेतकर्यांच्या रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्याचे प्रस्तावित असून याला मान्यता देण्यात आली.