प्रहारच्या पुढाकाराने महिलांना मिळाला न्याय
गोंदिया (Mundan Andolan) : महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ग्रामीण भागात महिलांचे बचत गट तयार करणे, त्यांना आर्थिक बाजुने सक्षम रोजगार निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करने व इतर कामे माविमच्या महिला सीआरपी यांच्याकडून शासन करवून घेते. परंतु, उमेद व माविम यातंर्गत काम करणार्या महिला सीआरपी यांना देण्यात येणार्या मानधनात दुजाभाव केला जात आहे. शासन व प्रशासनाच्या भेदभावपूर्ण कार्यप्रणालीला घेवून प्रहारने एल्गार पुकारला असून मुंडण (Mundan Andolan) करून श्राध्द आंदोलन करून निषेध नोंदविला. माविमच्या सीआरपी महिलांना समान मानधन देवून न्याय द्यावा, अशी मागणी केली. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी केले.
गोंदिया जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत. त्यात ६ तालुक्यात उमेदद्वारे कामे करण्यात येतात तर २ तालुक्यात तिरोडा आणि सालेकसा तालुक्यात माविमद्वारे कामे करुन घेण्यात येतात दोन्हीचे काम सारखेच सम-प्रमाणात आहेत परंतु. शासन उमेदच्या सीआरपी महिलांना ६००० रुपये प्रती महिना मानधन व माविम च्या महिलांना २००० रुपये प्रती महिना मानधन देण्यात येत आहे. ही दुजाभावपूर्ण भुमिका सोडून शासन, प्रशासनाने समान मानधन द्यावे, अशी मागणी महिलांकडून करण्यात आली. या संदर्भात शासन, प्रशासनाला निवेदन देण्यात आले. परंतु, निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकाराला संतापून प्रहारच्या नेतृत्वात १ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचे श्राद्ध व मुंडण आंदोलन (Mundan Andolan) करण्यात आले. मागणी पूर्ण न केल्यास उग्र भूमिका घेण्याचा इशाराही यंत्रणेला देण्यात आला आहे.
आंदोलनाचा धसका घेत मागणी मंजूर
मानधन वाटपात समानता न आल्यास अधिक तीव्र आंदोलन (Mundan Andolan) करणार, असा इशारा प्रहार संघटन व महिलांच्या वतीने यंत्रणेला देण्यात आला. या यंत्रणेचा धसका घेत मागणी मंजूर करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी यांचा समोर प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी, प्रदीप निशाने, सुनील गिरडकर, ईश्वर कोल्हारे, वनिताताई भांडारकर, सरोज कावळे, चंदू बडवाईक, महिला सीआरपी व लेखापाल युनियनचे तालुका अध्यक्ष रजनी हरडे, चंद्रकला कटरे, पौर्णिमा पंधरे, नमिता अंबुले, नलूताई आदमने, शालू पटले, ममता बावनथडे, मीनाक्षी बारबैले सालेकसा तालुक्यातील सर्व सीआरपी व लेखापाल प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत येत्या एक ते दोन महिन्यात एप्रिलपासून ते आजपर्यंत मानधन ६ हजार रूपये प्रमाणे देण्यात येईल, असे माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांनी ग्वाही दिली.