- गोंदिया-बल्लारशाहा मेमू गाडीचा प्रवास झाला ७ तासांचा
देशोन्नती वृत्तसंकलन
देसाईगंज (Desaiganj) :- हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया ते नागपूर (Gondia to Nagpur ) दरम्यानचा प्रवास सध्या डोकेदुखीचा झाला आहे. तर हेच चित्र आता गोंदिया-चांदा फोर्ट या रेल्वे मार्गावर निर्माण झाले आहे. गोंदिया-बल्लारशाह (Gondia-Ballarshah) या चार तासांच्या प्रवासासाठी आता ७ ते ८ तास लागत असल्याने या मार्गावरील प्रवासी त्रस्त झाले आहेत. या मार्गावरील मेमू आणि डेमू गाड्यांचे वेळापत्रक केव्हा सुधारणार, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गावर लोकल आणि एक्सप्रेस गाड्या (Express trains) धावतात. या लोकल गाड्यांचे तिकिटाचे दर कमी असल्याने सर्वसामान्य प्रवाशांसाठी ते सोयीचे आहे. त्यामुळेयागाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण मागील काही महिन्यापासून या मार्गावरील मालगाड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मालगाड्यांसाठी प्रवासी गाड्या तासनतास थांबवून ठेवल्या जात आहे. त्यामुळे गोदिया ते बल्लारशाह हा चार तासांचा प्रवास आता ७ ते आठ तासांचा झाला आहे. तर रेल्वे गाड्या रस्त्यात कुठेही दीड ते दोन तास थांबवून ठेवल्या जात असल्याने प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्याची अडचण होत आहे बल्लारशा- गोंदिया मेमू गाडी क्रमांक ०८८०३ ही सकाळी ६:३० वाजता बल्लारशाहहून सुटते. त्यानंतर ही गाडी बाबूपेठ रेल्वे स्थानकावर सकाळी ८ वाजतापर्यंत थांबवून ठेवली जाते. त्यानंतर ही गाडी सोडली की मुल जवळ मालगाडीला पास करण्यासाठी ही गाडी थांबवून ठेवली जाते. त्यामुळे सकाळी ११:३० वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावर पोहोचणारी ही गाडी दुपारी १:३० वाजता पोहोचत आहे. तर हेच चित्र गोंदियाहून बल्लारशाहकडे जाणाऱ्या गाड्यांचे आहे. यामुळे रेल्वेमार्गाने प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत. रेल्वे प्रशासनाने या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
- रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सुधारा अन्यथा
गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गावरील मेमू, डेमू आणि एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक त्वरित सुधारण्यात यावे, अन्यथा या विरोधात रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे. मालगाड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मालगाड्यांना आधी पास करण्याचे धोरण आहे. त्यामुळेयासाठी प्रवासी गाड्यांना वेठीस धरले जात आहे. मालगाड्यांमुळे मेमू, डेमू गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे.