गडचिरोली (gadchiroli news today) : – भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत पोलिसांना तीन नक्षल्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले आहे. या चकमकीत नक्षल्यांच्या पेरिमिली दलमचा प्रभारी आणि कमांडर डीव्हीसीएम वासू(DVCM Vasu) ठार झाला आहे. घटनास्थळावरून आणखी दोन महिला नक्षलींचे मृतदेह पोलिसांनी हस्तगत केले आहेत.पेरिमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना आज 13 मे रोजी सकाळी मिळाली.त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सी60 च्या दोन तुकड्या तातडीने परिसरात शोधासाठी दाखल करण्यात आल्या. पथके परिसरात शोध मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. याला C60 पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता 1 पुरुष आणि 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. गोळीबाराच्या ठिकाणाहून तीन स्वयंचलित शस्त्रे – 1 एके 47, 1 कार्बाइन आणि 1 इन्सास व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. मृतदेह पेरिमिली दलमचा प्रभारी आणि कमांडर डीव्हीसीएम वासू याचा असून इतर सदस्यांची ओळख पटवली जात आहे.