कुनघाडा रै (Gadchiroli) :- मनात जिद्द ,चिकाटी, ध्यास असला की यशाचे शिखर सहज गाठता येते. याचे ताजे उदाहरण अंश पेंटू गंधमवार आहे. माध्यमिक शालांत दहावी बोर्ड परीक्षेचा (10th board exam) निकाल नुकताच लागला असून, येणापुर येथील इंदिरा गांधी विद्यालयाचा अंश पेंटू गंधमवार याने ९०.६० टक्के गुण मिळविले आहेत.अंश याचे यश सर्वसामान्य परिस्थितीतील विद्यार्थ्यासाठी आदर्श उदाहरण ठरत आहे.
वृत्तपत्र वाटप करणार्या अंशवर वृत्तपत्र विक्रेते संघटनांची कौतुकाची थाप
अंश यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने तो सकाळी घरोघरी वृत्तपत्र वाटप करण्याचे काम करतो. त्यानंतर तो शाळेत जातो. शाळेत अभ्यासू विद्यार्थी म्हणून त्याची ओळख आहे. घरी आल्यावर नियमित गृहकार्य करीत अभ्यास सुद्धा करीत होता. दहावीच्या निकालानंतर यशाच्या बातम्या वृत्तपत्रात (newspaper) झळकलेल्या पाहून आपण सुद्धा चांगले यश मिळवले तर आपले सुद्धा वृत्तपत्रातून कौतुक होईल अशी अपेक्षा चामोर्शी येथील वृत्तपत्र विक्रेते ज्ञानेश्वर गोहने यांच्याजवळ व्यक्त केली होती. लागलीच चामोर्शीचे प्रतिनिधी प्रकाश घोगरे यांनी फोन करून शुभेच्छा देत माहिती जाणून घेतली. अंश याने कोणतीही शिकवणी लावली नाही. मात्र अभ्यासात सातत्य ठेवत त्याने यशाला गवसणी घातली. अंशला शिकून मोठे होऊन समाजाची सेवा करायची आहे असे मत त्याने प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
सकाळी वृत्तपत्र पार्सल वाट पहात असलेला अंश घरोघरी वृत्तपत्र वाटप करून सुवार्ता पोहचविणारा अंश स्वतः मात्र प्रसिद्धीपासून दूर होता. वृत्तपत्र वाटप करणार्या अंशवर वृत्तपत्र विक्रेते संघटनांनी कौतुकाची थाप देत अभिनंदनाचा वर्षाव केला.