माणसाला कोणतातरी खेळ खेळलाच पाहिजे असं नेहमी म्हणतात, यासाठी की माणूस त्यामुळे क्रियाशील राहतो, त्याला आनंद येतो, उत्सुकता राहते आणि अनेक अर्थाने त्याचा काही ना काही व्यायामसुद्धा झालेला असतोच की नाही? असं म्हणण्यामध्ये कोणताही मैदानी किंवा इतर खेळाचा समावेश असतो यात शंका नाही. मात्र, त्याशिवाय अनेक काही खेळ आहेत जी सर्वच माणसं नेहमी खेळत असतात. मात्र, त्यांना आपण अमुक खेळ खेळतो आहे हे जाणवत नाही.
मुलं लहान असो की मोठी! ती एखादा खेळ खेळत असतात, तो खेळ मनोरंजनासाठी असतो, आनंदासाठी असतो किंवा काही लोकांना एखादा खेळ सतत खेळण्याची सवयच लागते. त्यांना सतत आनंद येतो, दिवसभर ते त्या खेळाच्या विचारात मग्न असतात आणि असणं काही चुकीचं नाही. मग हा खेळ आवडीचा असतो, व्यवसायाचा असतो, उद्देशाचा असतो किंवा स्वीकारलेल्या एखाद्या दिशेसंबंधी असतो. खरंतर तो खेळत राहणे हे आवश्यक आहे आणि ते जिवंतपणाचे एक लक्षणसुद्धा! कोणत्याही प्रकारच्या खेळातून माणसाला काहीतरी मिळत असते आणि ते मिळवण्यासाठीच तो त्या खेळाला सतत खेळत असतो. त्यासाठी एक विशिष्ट उद्देश असतो, हेतू असतो आणि तो हेतू पूर्ण होत राहिला म्हणजे माणसाला आनंद येतो. तो हेतू पूर्ण होण्यासाठी त्याची सातत्याने धडपड सुरूच असते, ज्याला खेळ असं म्हणायला हरकत नाही.
कुणीही खेळत असताना त्याला पाहणारे अनेकजण बसलेले असतात किंवा त्याच्यासोबत अनेकजण खेळत असतात. ते बहुदा वाटही पाहत असतात, की अमुकचे खेळून झाले म्हणजे आपल्याला खेळता येईल मात्र अमुकचं खेळणं संपल्यानंतरच त्यांना खेळता येतो, हे विसरून कसं चालेल? अमुक एखाद्या खेळाडूला जेवढा वेळ खेळायचा आहे आणि जे खेळायचं आहे ते तो खेळणारच असतो. कुणी एखाद्या खेळात चांगलाच जमला म्हणजेच त्याला खेळता आलं तर तो बराच वेळ खेळत राहतो, हे पाहून काही वेळेला काही लोकांना कदाचित आश्चर्य वाटेल, थोडीशी खंतही वाटेल मात्र त्यांना काहीच करता येत नाही अन् त्यांनी करू नये हेच योग्य आहे, कारण ज्याचा त्याचा खेळ असतो आणि ज्याला त्याला योग्य वेळेला तो खेळता येतो मात्र खेळण्याची पद्धत प्रत्येकाची स्वतंत्र असू शकते. हेतू वेगवेगळा असू शकतो, हे मान्य केलं म्हणजे माणसाला कुठेही मनात अस्वस्थता निर्माण होत नाही. कुणी किती वेळ खेळावं, काय खेळावं यासंबंधी माणसाच्या मनात आलेला विचार जर त्याला कृतीत आणता आला असता तर त्याच्या आनंदाला नक्कीच कात्री लाभली असती किंवा क्षणिक आनंद त्याला मिळाला असता, पण असं होत नाही. बर्याचदा लहान मुलं ज्या वेळेला एखादा सामूहिक खेळ खेळत असतात तेव्हा त्यांच्या मनात हा विचार असू शकतो की त्यांनाही ते खेळायचं आहे, पण खेळता येत नाही. कसं बरं खेळता येईल? आणि का खेळता येईल? प्रत्येकाला जर दुसर्यासारखं खेळता आलं असतं तर जगातील विविध खेळांमध्ये सर्वोच्च असलेल्या लोकांसारखी नावे अनेक राहिली असती यात शंकाच नाही. मात्र, ती नसतात हे सत्य आहे. हे एकदा माणसाला जाणवलं, की त्याच्या तक्रारी दूर होतात, कारण त्या तक्रारी निव्वळ मानसिक स्तरावरच्या असतात.
खरंतर एकाला दुसर्यासारखं खेळता येत नाही म्हणजेच करता येत नाही याची खंत किंवा दुःख, तक्रारी किंवा नाराजी असणंच मुळात कमी विचार करण्याचे लक्षण आहे. कुणी त्याला बावळटपणाचे किंवा मूर्खपणाचेही म्हणेल, कारण परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळी योग्यता दिली आहे हे मान्य करणे अत्यावश्यक ठरते. एकाला करता येते म्हणजे दुसर्याला करता येत नाही, हे सत्य आहे पण हे सत्य नाकारले किंवा नाकारण्याचा प्रयत्न झाला म्हणजे त्यात दोन गोष्टी होतात. एक तर माणूस अधिक प्रयत्न करतो किंवा तो नाराज होतो, त्याचा जळफळाट होतो आणि विनाकारण स्पर्धा केल्याने त्याला अपयशाचा, दु:खाचा सामना करावा लागतो. ही एक प्रकारची मानसिक समस्याही असल्याची शक्यता असतेच. मुल्ला नसरुद्दीन त्याच्या एका चांगल्या जाणकाराकडे गेला आणि तक्रार करू लागला, की त्याची मुलं पाण्याच्या टबमध्ये बसून रबराच्या बदकासोबत कितीतरी वेळ खेळत राहतात, पण त्याला तिथं खेळता येत नाही. जाणकार म्हणाला, ‘पाण्यात खेळतात तर खेळू द्या. तुम्हाला काय त्रास आहे? त्यांच्यासारखं खेळता येत नाही याची खंत वाटते का? ती मुलं आनंदात आहेत, हे तुम्हाला पाहवत नाही का?’ मुल्ला नसरुद्दीन लगेच म्हणाले, ‘पाण्यात बसून दिवसभर खेळत राहतात, मलासुद्धा त्या पाण्यात खेळायचं आहे, पण खेळता येत नाही.
‘ मुख्य मुद्दा जाणकाराच्या लक्षात आला. त्याने स्मित हास्य केलं. लगेच म्हणाला, ‘तुम्ही तुमचं खेळा, पण त्यांना त्यांचं खेळू द्या. ते खेळतात तसंच तुम्हाला का खेळावंसं वाटतं? तुम्ही तुमचा खेळ आहे, खेळा ना! तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या गरजेनुसार, तुमच्या आवडीनुसार आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या वेळेनुसार, परिस्थितीनुसार खेळा. लहान मुलं नाही का त्यांच्या खेळण्यासोबत खेळतच असतात, पण मोठ्या माणसांनी ते स्वतः जो खेळ खेळतात म्हणजेच काम करतात, त्यातून काही वेळ तरी बाहेर आलंच पाहिजे की नाही? त्यांच्या खेळण्याचे विषय वेगळे आणि तुमच्या खेळण्याचे विषय वेगळे आहेत, हे का बरं लक्षात येत नाही? तुम्ही जे करत आहात, ते एक प्रकारचे खेळणेच नाही काय? धन-संपत्ती, यश-पद, प्रतिष्ठा-मान्यता वगैरे एक प्रकारचे खेळणेच नाही का? हे सर्व खेळणे तुम्हाला गुंतवून ठेवतातच व्ाâी नाही? कुणी राजकारणाचा, कुणी पैसा कमावण्याचा, कुणी प्रतिष्ठा कमावण्याचा खेळ खेळतच राहतो की नाही? या खेळात माणसाला कुठे थांबावं लागतं, कधी वाट पाहावी लागते, तर कधी हार होते पण तरीही माणूस खेळतोच की नाही? पण कोणता खेळ किती वेळ खेळायचा हेही तुम्हाला तरी ठरवावे लागतेच की नाही? खरंतर सगळीच माणसं अखेरपर्यंत त्यांच्या आवडीचा खेळ खेळतच असतात मग लहान मुलांनी, इतरांनी अधिक वेळ खेळला तर इतक्या जोर जोराने तक्रारी का बरं? तुमच्या खेळाकडे लक्ष द्या, गरज असेल, आवश्यक असेल तरच इतरांच्या खेळाकडे लक्ष द्या अन्यथा मुळीच नाही. इतरांसारखंच आणि इतरांइतकं खेळलंच पाहिजे असा अट्टाहास का बरं करताय तुम्ही…’. प्रत्येकाला दुसर्यासारखं खेळता येत नाही मात्र दुसरा कोणी खेळत असेल तर त्याचा आनंद घेता येतो की नाही? नक्कीच घेता येतो. यामुळेच तर फुटबॉलचा, टेनिस, बॅडमिंटनचा, कबड्डीचा असो की क्रिकेटचा असो, तो पाहत आनंद घेणार्यांची संख्या खूप आहे. का बरं? तर ते इतरांना उत्तम खेळताना पाहत आनंदित होऊन जातात, रोमांचित होतात, मग्न होतात म्हणूनच! स्वतः कधी खेळतात पण त्या खेळाडू सोबत खेळण्याचा अट्टाहास करत नाहीत. सहभागी होतात, प्रसंगी साथही देतात. त्यांच्या मनात असतात, प्रसिद्ध कवी हरेंद्र ‘हमदम’ दिलदारनगरी यांच्या या ओळी –
जो भी करना है ,जतन सब कर लेंगे
उनके मर्जी मुताबिक, कदम धर लेंगे
चाहत में ‘मै’ नहीं चालता साथी
कुछ भी हो, मै को ‘हम’ करे लेंगे
प्रा.डॉ.मोहन खडसे
९८२३२८९०१०
(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभ लेखक, शिक्षण तज्ज्ञ असून त्यांच्या ‘सावित्री फाऊंडेशन, अकोला’ च्या माध्यमातून सक्रिय
सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात) अकोला ,
ईमेल: mvkhadse9@gmail.com