कारंजा(Washim) :- श्री गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना हातातील झेंडा लागल्याच्या कारणावरून १७ सप्टेंबर रोजी रात्री स्थानिक बेंबळपाट जवळ राडा झाला. या घटनेत चौघांनी संगनमत करून तिघांना मारहाण (beating) केली. ज्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी कारंजा शहर पोलिसांकसून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंबळपाट भागातील महाशक्ती गणेश मंडळाची मिरवणूक सुरू असताना घटनेतील फिर्यादी युवकास मुख्य आरोपीच्या हातातील झेंडा लागला. याबाबत समजावण्यासाठी गेले असता, आरोपीने फिर्यादीस काहीही ऐकून न घेता थापडाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणूक संपल्यावर याच रात्री १०.३० वाजता फिर्यादीचा चुलतभाऊ रितेश माणिकराव पोटफोडे याला मुख्य आरोपीने मारहाण केल्याचे फिर्यादीला कळले. यावेळी फिर्यादीची मोठी आई कांताबाई माणिकराव पोटफोडे यांनी आरोपीला ‘ तू योगेशला का मारहाण केली? ‘ असे विचारले असता, आरोपी व त्याच्या अन्य साथीदारांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी फिर्यादीचा चुलत भाऊ रितेश पोटफोडे याच्या हातापायावर व तोंडावर काठीने मारुन जखमी केले. तर मोठी आई कांताबाई यांना पाठीवर काठीने मारहाण केली. तसेच सर्वांना शिवीगाळ (Abusing)करून जिवाने मारण्याची धमकी दिली, अशा आशयाच्या योगेश सुरेश पोटफोडे (२५, रा. बेंबळपाट जवळ कारंजा ) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल ठक (३०, रा. माळीपुरा), राजेश लाड (५५), चिंग्या लाड (२५) व अभिजीत लाड (२२) सर्व रा.बेंबळपाट जवळ कारंजा यांच्याविरुद्ध कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) ३(५) बी.एन.एस नुसार गुन्हा दाखल केला आहे.