परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील घटना
परभणी/गंगाखेड (Gangakhed Accident) : अपघात घडताच चपळाई दाखविल्याने व दैव बलवत्तर म्हणून दोन दुचाकी स्वारांचे प्राण वाचल्याची घटना रविवार ८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्यासमोर घडली. या घटनेत दुचाकीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असले तरी दोघांचा जिव वाचल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड साखर कारखान्यातील कर्मचारी गौतम मुंजाजी पाचंगे वय ४० वर्ष रा. पांगरी कॅम्प ता. परळी जि. बीड ह. मु. गंगाखेड साखर कारखाना वसाहत हे रविवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सासरे शिवाजी श्रीधर कांबळे वय ६० वर्ष रा. शिंपरी पारगाव ता. माजलगाव जि. बीड यांना सोडण्यासाठी गंगाखेड पोलीस ठाण्यासमोरील बस थांब्यावर आले. (Gangakhed Accident) येथे दुचाकी उभी केल्यानंतर दुचाकीवरून उतरत असतांना त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रक क्रमांक एमएच २२ एन २०५९ च्या चालकाने दुचाकीला जोराची धडक दिली. यात शिवाजी कांबळे दुचाकी पासून दूर फेकल्या गेले तर गौतम पाचंगे ट्रकच्या चाकात आलेल्या दुचाकीसमोर पडले. दुचाकीला फरफटत ट्रक त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून त्यांनी चपळाई दाखवत ट्रक पुढे घसरत गेले येथे उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा केल्याने ट्रक थांबला.
पोलीस ठाण्यासमोर (Gangakhed Accident) झालेला गोंधळ ऐकून धावत आलेल्या सपोनि शिवाजी शिंगणवाड, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड, विशाल बुधोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ आदोडे व तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी घाबरलेल्या दोन्ही दुचाकी स्वारांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश वडाजे, आधिपरिचारिका वैशाली भालेराव, प्रणिता शिंदे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठविले. या घटनेत दुचाकी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी दोघांचे जिव वाचल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडत दैव बलवत्तर असल्याने व चपळाई दाखविल्यानेच दोन्ही दुचाकी स्वारांचे प्राण वाचल्याचे सांगितले.