खा. संजय जाधव यांच्या उपस्थितीत
डॉ. मधुसुदन केंद्रे महाविकास आघाडीचा प्रचार करणार
गंगाखेड (Gangakhed Assembly Election) : विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार असे चित्र असतांना महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचे दाजी आ.डॉ. मधुसुदन केंद्रे माजी यांनी एकदम रस्ता बदलून महाविकास आघाडीचे काम करणार असल्याची घोषणा एका पत्रकार परिषदेतून केली. गंगाखेड विधानसभेत विशाल कदम यांच्या मशालचा प्रचार करणार असल्याचे सांगुन महायुतीमध्ये वरीष्ठ पातळीवर ताळमेळ नसल्याची टिका त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेला खा. संजय जाधव, .मिथिलेश केंद्रे, लिंबाजीराव देवकते, तालुकाध्यक्ष शंकर मोरे, शहराध्यक्ष अन्वरखान पठाण, पूर्णा येथील शहाजी देसाई, महिला जिल्हा प्रमुख सखुबाई लटपटे, अॅड. मनोज काकानी, अनिल सातपुते, जानकीराम पवार, प्रमोद मस्के, गोविंद जाधव, शेख खाजा, डॉ. देवीदास चव्हाण,रितेश काळे आदींसह गंगाखेड, पुर्णा, पालम तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ. केंद्रे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, आ. रत्नाकर गुट्टे यांचे काम महायुतीमध्ये असले तरीही करणार नाही.
तसेच माझ्या बुध्दीला महायुतीमधील काही धोरण हे पटत नव्हते. मतदार संघ कोणाचा कोणालाही देऊन टाकले जात आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला जात आहे. राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांच्या हातात जिल्हा नियोजनाचा निधी देण्याचाही अधिकार नाही. माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झालेला मी सहन करणार नाही. पक्षाचे धोरण चुकीचे होत असल्याने आता आम्ही परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे काम करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. (Gangakhed Assembly Election) विधानसभा झाल्यावर मी पुढचा काय निर्णय घ्यायचा ते ठरवु असे म्हणत डॉ. केंद्रे यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे.