शिवसेना (उ.बा.ठा.) उपनेते खा. संजय जाधव
परभणी/गंगाखेड (Gangakhed Assembly Election) : विधानसभा मतदार संघातील मतदारांनी येत्या २० नोव्हेबर रोजी मतदान करून येथील भस्मासुराचा नायनाट करावा असे अवाहन महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेचे (उ.बा.ठा.) उपनेते खा. संजय जाधव यांनी सोमवार २८ ऑक्टोबर रोजी विशाल कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना काढलेल्या रॅलीत बोलतांना केले.
शिवसेना (उ.बा.ठा.), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांनी सोमवार २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतांना शक्ती प्रदर्शन करीत गंगाखेड शहरातील गोदातटावर असलेल्या चिंतामणी मंदिर पासून ते पोलीस ठाण्यासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीच्या समारोपाप्रसंगी बोलतांना शिवसेना (उ.बा.ठा.) उपनेते खा. संजय जाधव यांनी विद्यमान आमदारांवर सडकून टिका करत येथील विद्यमान आमदारांनी दादागिरी करत एका एका विरोधकाला संपवायचे काम केले.
आज या गंगाखेड मतदार संघातील (Gangakhed Assembly Election) व्यापारी, शेतकरी, डॉक्टर, वकील, सरपंच, सामान्य नागरिक, महिला कोणीच सुरक्षित नसल्याचे सांगत लोकांच्या जमिनी हडप करणाऱ्या व साखर कारखाण्याच्या नावाखाली सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या सात बारावर लाखो रुपयांचा कर्ज बोजा टाकणाऱ्या या भस्मासुराचा नायनाट करण्यासाठी सर्व मतदारांनी निसंकोचपणे मतदान करण्याचे आवाहन शिवसेना (उ.बा.ठा.) उपनेते खा. संजय जाधव यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्या खा. प्रा. फौजीया खान, माजी आ. विजय गव्हाणे, बाळ काका (रविकांत) चौधरी, बालाजी देसाई, माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, शहाजी देसाई, प्रा. किरण सोनटक्के, सखुबाई लटपटे, श्रीमती देशमुख, मारोतराव पैलवान बनसोडे, रमाकांत कुलकर्णी, अनिल सातपुते, अँड. मनोज काकाणी, गंगाप्रसाद आनेराव, विष्णू मुरकुटे, जितेश गोरे, गोविंद जाधव आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.